• Thu. Jul 9th, 2026

    पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी ‘महाराष्ट्र शासन ॲक्शन मोड’वर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 9, 2026
    पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी ‘महाराष्ट्र शासन ॲक्शन मोड’वर – महासंवाद

    मुंबई, दि. ९: पुणे जिल्ह्यातील मोशी येथे दुर्घटनेत इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून प्राप्त माहिती नुसार नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे असे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळविले आहे. मोशी येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी काल रात्री भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्याची पाहणी केली.

    दुर्घटनेच्या वेळी इमारतीत एकूण २३ नागरिक अडकले होते. त्यापैकी इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेले ५ नागरिक स्वतःहून सुरक्षित बाहेर आले, उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

    पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वादळी वारे आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेऊन राज्य शासन ‘ॲक्शन मोड’वर कार्यरत झाले आहे. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसेच राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्यात समन्वय साधून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. पुणे येथील मोशी व पालघर मधील पुरस्थितीत बचाव कार्य, व घटनांमुळे नागरिकांचे प्राण वाचले आहेत.

    पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी ‘महाराष्ट्र शासन ॲक्शन मोड’वर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये आयोजित बैठकीत राज्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्ती व व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी यावेळी कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.

    नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर, मदत व बचावकार्य, तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवणे अशा विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. याशिवाय नागरिकांना सतर्क राहण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शासनाच्या या तत्पर आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे पावसाळ्यातील आपत्तींचा परिणाम कमी करून जनजीवन सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    गंभीर परिस्थितीतही विविध यंत्रणांची प्रभावी कामगिरी

    मुंबईत सहा दिवसात कुलाबा येथे ८८२ मिमी आणि सांताक्रूझ येथे ९८८ मिमी पावसाची नोंद झाली. केवळ सहा दिवसांत वार्षिक पावसाच्या सुमारे ४२ टक्के पाऊस झाला. यंदाच्या पावसाळयात १ जून पासून अवघ्या सहा दिवसांत जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा देखील अधिक पाऊस झाला. यासह ताशी ५० ते ७५ किलोमीटर वेगाचे वारे आणि चार मीटरपेक्षा अधिक उंच भरतीमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. अशा परिस्थितीतही विविध यंत्रणांनी प्रभावी कामगिरी केल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाव्दारे सांगितले .

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियंत्रण कक्षास भेट देऊन पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्तीच्या काळात परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेता तात्काळ उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. यावेळी आमदार चेतन तुपे, जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते.

    पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गावांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी पालघर जिल्ह्याचा दौरा करून पूरस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदत व बचावकार्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. दौऱ्यादरम्यान मंत्री महाजन यांनी जव्हार, मनोर तसेच जिल्ह्यातील विविध पूरग्रस्त भागांना भेट दिली.

    मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक भालचंद्र चव्हाण यांच्याकडून रायगड, रत्नागिरीसह राज्यातील पूरस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

    ठाणे जिल्ह्यातील कळवा पूर्व येथील भास्कर नगर परिसरातील आदर्श चाळ येथे डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाणी खाली येत असल्याने घरे वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी करून आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले. घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही सुरू केली. यामुळे सध्या कोणत्याही घरात पाणी नसून परिसरातील सर्व घरे सुरक्षित आहेत. या घटनेत कोणतेही घर पडलेले नाही. तसेच कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झालेली नाही.

    पुणे जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची वाढती गर्दी, संभाव्य अपघात तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ लागू करण्यात आले आहे. हा आदेश ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. या उपाययोजना आणि पावसाळ्यात आपत्तीच्या परिस्थितीमध्ये शासन ॲक्शन मोडवर आल्यामुळे आपत्तीचे तीव्रता कमी होत नसली तरी रेस्क्यू ऑपरेशन वेगात होत आहे .

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed