- सहा जणांना बाहेर काढण्यात यश ; तिघांशी संपर्क, उर्वरित जणांचा शोध सुरु
पुणे, दि. ८ : पिंपरी-चिंचवड परिसरातील मोशी येथे कचऱ्याचा ढीग कोसळून इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून आता पर्यंत सहा जणांना सुखरूप बाहेर काढले असून उर्वरित सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
मोशी येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर मंत्री श्री. महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्याची पाहणी केली. यावेळी आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, महापौर रवी लांडगे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. महाजन यांनी सांगितले की, दुर्घटनेच्या वेळी इमारतीत एकूण २३ नागरिक अडकले होते. त्यापैकी इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेले ५ नागरिक स्वतःहून सुरक्षित बाहेर आले, तर बचाव पथकाने ६ नागरिकांना सुखरूप बाहेर काढले आहे. आणखी ३ नागरिकांशी संपर्क झाला असून तेही सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

ते पुढे म्हणाले की, गेल्या ३० ते ३५ तासांत परिसरात ६०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे कचऱ्याचा मोठा लोट इमारतीच्या दिशेने वाहून आल्याने ही दुर्दैवी दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा असून सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
सध्या घटनास्थळी इमारतीचा मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. मात्र, जागा अत्यंत कमी असल्यामुळे बचावकार्य संथगतीने करावे लागत असून ही मोहीम रात्रभर आणि आवश्यक असल्यास सकाळपर्यंतही सुरू राहणार आहे. बचावकार्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणा परस्पर समन्वयाने कार्यरत असल्याचेही श्री. महाजन यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बचाव पथकाने सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण आणि रणवीर सिंह यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. तसेच घटना घडल्यानंतर अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार आणि श्री बाला हे स्वतःहून सुरक्षित बाहेर पडले.
—
