• Tue. Jul 7th, 2026
    Maharashtra Politics : पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याची चर्चा, संभाव्य राजकीय भूकंपावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

    शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नवी दिल्ली / मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी नवा भूकंप घडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार याच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आगामी काळात सत्तेत सहभागी होण्यासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा निर्माण होण्यामागे दोन बड्या नेत्यांची भेट कारणीभूत ठरली आहे. शरद पवारांचे विश्वासू नेते जयंत पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांची नुकतीच भेट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यांच्या या भेटीवरुन शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी व्हावा यासाठी हालचारी सुरु असल्याची चर्चा आहे. या वृत्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

    चर्चेस कारण काय?

    राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चांनुसार, केंद्र सरकारला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत मंजूर करुन घ्यायचं आहे. याआधी केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावत हे विधेयक मांडलं होतं. पण हे विधेयक मान्य होऊ शकलं नव्हतं. त्यामुळे आता केंद्र सरकार पुन्हा हे विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता आहे.

    या विधेयकाला मंजुरी मिळावी यासाठी भाजपला आणखी खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 8 खासदार आहेत. त्यामुळे जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या अनौपचारिक भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

    सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दोन्ही नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. “दोन्ही नेत्यांनी एकत्रित काम केलं असताना त्यांच्यात पक्षविरहीत मैत्रीचं नातं आहे. त्यामुळे कदाचित ते भेटले असावेत”, असं दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत प्रश्न विचारला असता, “जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची बैठक कुठे झाली? मला नाही माहिती. मी तुमच्याकडून ऐकत आहे”, असं उत्तर त्यानी दिलं.

    विजय वडेट्टीवार यांचं सूचक वक्तव्य

    काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या चर्चांवर सूचक वक्तव्य केलं आहे. “शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. एवढं मात्र नक्की आहे. आता त्यांना कोणता रस्ता सोयिस्कर असतो, वैचारिक की सत्तेचा?”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

    रोहित पवार काय म्हणाले?

    दुसरीकडे रोहित पवार यांनी या चर्चा फेटाळल्या. “अशी फक्त चर्चा आहे. त्याला कुठेही तथ्य नाही. तशापद्धतीने ना केंद्रात एनडीएच्या नेत्यांबरोबर, ना महाराष्ट्रात आणि ना काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा सुरु आहेत”, असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं

    देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

    या सर्व घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. “महाराष्ट्रातून NDA मध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष NDA मध्ये राहतील. कुठलाही नवीन पक्ष आता एनडीएमध्ये येण्याची आमची चर्चा नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

    “आम्ही शरद पवारांच्या सोबतच्या कुणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही. जे त्यांच्यासोबत आहेत, शरद पवार यांच्या पक्षात जे आमदार आणि खासदार आहेत, त्यापैकी कुणालाही तोडण्याचा आमचा प्रयत्न नाही”, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा