• Tue. Jul 7th, 2026

    साहित्यातूनच संस्कृतीचे जतन आणि संवर्धन शक्य – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 6, 2026
    साहित्यातूनच संस्कृतीचे जतन आणि संवर्धन शक्य – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    नाशिक, दि. ६ जुलै २०२६ (जिमाका वृत्तसेवा): साहित्य हे समाजाच्या विचार विश्वाला दिशा देण्याचे प्रभावी माध्यम आहे. आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन हे साहित्यातूनच खऱ्या अर्थाने केले जाऊ शकते. कुसुमाग्रज अर्थात तात्यासाहेब वि. वा.शिरवाडकर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून मराठी साहित्य विश्व समृद्ध करत समाजमन घडविण्याचे मोठे कार्य केले, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.

    कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक येथे के.ज.म्हात्रे वाचनालय विस्तारीत इमारत लोकार्पण सोहळा कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार बोलत होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सत्यजित तांबे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कवी प्रकाश होळकर, नगरसेवक तथा प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त गुरमितसिंग बग्गा, ॲड. दत्तप्रसाद निकम, लोकेश धोंगडे, ॲड. राजेंद्र डोखळे, मकरंद हिंगणे यांच्यासह विद्यार्थी, अभ्यासक तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, तात्यासाहेब शिरवाडकर यांनी समर्पित भावनेने साहित्यसेवा केली. त्यांच्या साहित्यामध्ये मानवी मूल्ये, सामाजिक जाणीव आणि परिवर्तनाचा विचार प्रभावीपणे मांडला गेला आहे. लेखक, कवी आणि नाटककार म्हणून त्यांनी मराठी साहित्याला नवी उंची प्राप्त करून दिली. त्यांच्या साहित्यकृती आजही समाजाला प्रेरणा देणाऱ्या आहेत.

    मराठी भाषेची परंपरा अतिशय समृद्ध असून ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वाचन संस्कृती अधिक बळकट होणे आवश्यक आहे. वाचनालये ही केवळ पुस्तके ठेवण्याची जागा नसून विचारांची देवाणघेवाण, ज्ञानवृद्धी आणि संस्कार घडविणारी केंद्रे आहेत. के. ज. म्हात्रे वाचनालयाच्या विस्तारित इमारतीमुळे विद्यार्थी, अभ्यासक, लेखक आणि साहित्यप्रेमींना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

    कुसुमाग्रज प्रतिष्ठानने मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम नव्या पिढीमध्ये साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी खासदार श्री. वाजे, आमदार श्री.तांबे, गुरमितसिंह बग्गा यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. डोखळे यांनी तर, उपाध्यक्ष श्री होळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमापूर्वी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते टिळकवाडी येथील कुसुमाग्रज वाचनालयाचे लोकार्पण झाले. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सुधीर तांबे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पदाधिकारी ॲड विलास लोणारी यांचेसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी वाचनालयाची पाहणी केली.

    000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed