• Mon. Jul 6th, 2026

    रायगड, रत्नागिरीसह राज्यातील पूरस्थितीचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 6, 2026
    रायगड, रत्नागिरीसह राज्यातील पूरस्थितीचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा – महासंवाद

    मुंबई, दि. ६ : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री. भालचंद्र चव्हाण यांच्याकडून रायगड, रत्नागिरीसह राज्यातील पूरस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

    भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी आज व उद्या मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून रत्नागिरी जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील ४८ तास दोन्ही जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रशासनाला आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना तत्काळ राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

    संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाड येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) तुकडी सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच सुधागड व रोहा परिसरात आपत्कालीन परिस्थितीत अधिक वेगाने आणि प्रभावीपणे प्रतिसाद देता यावा, यासाठी १४५ जवानांची अतिरिक्त तुकडी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

    पूर आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या कर्जत, खोपोली येथील विविध सेवाभावी संस्थांशी आपण नियमित संपर्कात असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. या संस्थांना शासनाकडून आवश्यक संसाधने उपलब्ध करून दिली जातील. तसेच जिल्ह्याच्या इतर भागांमध्येही त्यांच्या सेवांची आवश्यकता भासल्यास त्यांचे सहकार्य घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    राज्यातील पूरस्थितीवर प्रशासनासोबत स्वतः राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातून सातत्याने लक्ष ठेवत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण यंत्रणा सतर्क असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    राज्यातील सर्व नागरिकांनी अत्यंत आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, अनावश्यक प्रवास टाळावा तसेच स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

    000

    श्रध्दा मंश्राम/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed