• Tue. Jul 7th, 2026

    नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीची शक्यता; नागरिकांनी सतर्क राहावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 6, 2026
    नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीची शक्यता; नागरिकांनी सतर्क राहावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    नाशिक, दि. ६ जुलै (जिमाका वृत्तसेवा): नाशिक जिल्हा आणि विशेषतः त्र्यंबकेश्वर परिसरासाठी पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. या भागात एक मोठा तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्यामुळे ७ जुलै रोजी या भागात ढगफुटी सदृश पाऊस होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनदेखील मुख्यमंत्र्यांनी केले.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या ढगफुटीमुळे नाशिकच्या बऱ्याच भागांत आणि त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये जवळपास ३०० मिमी इतका प्रचंड पाऊस होऊ शकतो. ही एक मोठी आणि गंभीर घटना असण्याची शक्यता असल्याने राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन या परिस्थितीवर अतिशय करडी नजर ठेवून आहे.

    संभाव्य आपत्तीचा विचार करून नाशिक जिल्हा आणि शहर प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पूर्वतयारी केली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून बाधित होऊ शकणाऱ्या क्षेत्रांतील शाळांना सुट्टी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील ज्या ठिकाणी पाणी साचू शकते, अशा सर्व जागांवर प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. ढगफुटीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना आधीच लागू करण्यात आल्या आहेत.

    नागरिकांना आवाहन
    “हवामान विभागाने दिलेला मोठा नैसर्गिक इशारा लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, नदीकाठच्या आणि डोंगराळ भागात जाणे टाळावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.”— देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed