सातारा, दि.६: सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी आणि प्रशासनाने २४ x७ अलर्ट राहून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यातील पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सातारा जिल्ह्यातील परिस्थितीची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडून माहिती घेतली.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सातारा पश्चिम घाट भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. राज्यात विविध ठिकाणी ८ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्यातही प्रशासनाने दक्ष राहून आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीविषयक माहिती दिली. जिल्ह्यात जून ते आजअखेर २४२ मि.मी. पाऊस झाला. ६ जुलै रोजी जिल्ह्यात एकूण २१ महसूल मंडळांमध्ये ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे त्यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महाबळेश्वर, पाटण, सातारा, वाई पर्यटन स्थळे असून अनेक ठिकाणी छोट्याशा पावसानेही चिखल होऊन तेथील भाग निसरडा होतो. पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या काळात पर्यटन स्थळावर जाण्यासाठी पर्यटकांना तात्पुरती बंदी घालण्यात येणार आहे. तसेच ६ जुलै प्रमाणेच ७ जुलै रोजी सर्व महाबळेश्वर, पाटण, वाई, जावळी व सातारा या पाच तालुक्यांमधील सर्वशाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात येणार आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
भूस्खलन प्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने स्थलांतरासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, असेही जिलहाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.
कोयना धरणात २७.६७ टीएमसी, धोम धरणात ५.३६ टीएमसी, धोम बलकवडीमध्ये १.७८ टीएमसी, कण्हेर मध्ये ५.१९ टीएमसी, उरमोडी ३.८१ टीएमसी, तारळी १.२६ टीएमसी पाणी साठा उपलब्ध असून कोयना धरणात ७८ हजार ३२२ क्युसेक , धोम ११ हजार ८८७ क्युसेक, धोम बलकवडी ७ हजार १५७ क्युसेक, कण्हेर १३ हजार ५१५ क्युसेक, उरमोडी ४ हजार ४७३ क्युसेक तर तरळीत ३ हजार 50 क्युसेकने पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली..
0000
