• Mon. Jul 6th, 2026

    अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनांची चौकशी होणार; नागरिकांनी सतर्क राहावे – मंत्री गिरीष महाजन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 6, 2026
    अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनांची चौकशी होणार; नागरिकांनी सतर्क राहावे – मंत्री गिरीष महाजन – महासंवाद

    मुंबई, दि. ६: राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे नुकसान अशा घटना घडत असून, अशा सर्व घटनांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, नागरिकांनी सतर्क रहावे व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले.

    मंत्री महाजन म्हणाले की, अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती असून, ज्या ठिकाणी बोगदे, रस्ते किंवा इतर ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, त्या सर्व घटनांची चौकशी केली जाईल. राज्यभरात, तसेच मुंबई महानगरपालिकेकडून आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. झाडांच्या छाटणीसह धोकादायक ठिकाणांवर मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य यंत्रणा सतर्क आहे.

    राज्यात काही भागांत विक्रमी पाऊस झाला असून, विशेषतः मुंबई, रायगड आणि कोकण पट्ट्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन-चार दिवसांत राज्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये मानखुर्दमधील दुर्घटनेतील सहा मृत्यूंचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.

    मानखुर्द येथील दुर्घटनेनंतर आपण तातडीने घटनास्थळी भेट दिली होती. तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर होती. वर्षानुवर्षे धोकादायक अवस्थेत असलेल्या परिसरात नागरिक वास्तव्यास असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. धोकादायक इमारती खाली करण्यासाठी नोटिसा दिल्यानंतरही पर्यायी निवासाचा प्रश्न निर्माण होत असल्याने अनेक नागरिक स्थलांतरास तयार होत नाहीत. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी परस्पर सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

    अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, खासगी कार्यालयांनी शक्य असल्यास ‘वर्क फॉर्म होम’चा अवलंब करावा आणि परिस्थितीनुसार शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनाबाबत उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सविस्तर निवेदन करतील, असेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.

    अतिवृष्टीने सर्व जणांनी सतर्क राहून शासनाला मदत करावी. राज्यातील अतिवृष्टीची परिस्थिती पाहता आजचे कामकाज स्थगित करत आहोत, असे विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

    ००००

    शैलजा पाटील/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed