• Mon. Jul 6th, 2026
    Mumbai Rain: ‘कोसळ’धारांचे 12 बळी; सलग दुसऱ्या दिवशी महामुंबई परिसराला पावसाने झोडपले, दुर्घटनांची मालिका सुरुच

    Mumbai Rain Update: पावसात झाडे कोसळण्याच्या घटनांचे सत्र सुरूच असून कुर्ला आणि गोरेगाव येथे दोघांचा झाडांच्या फांद्या कोसळून मृत्यू झाला. तर नवी मुंबई आणि पनवेल येथे अतिवृष्टीशी संबंधित घटनांमध्ये चार जण ठार झाले.

    मुंबई पाऊस अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मुंबई आणि परिसराला रविवारी, सलग दुसऱ्या दिवशी, मुसळधार पावसाने झोडपून काढले. मानखुर्द येथे एका चाळीतील तीन मजली घर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला.

    मुंबई आणि उपनगरांत सकाळच्या सत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. मानखुर्द येथील जनता नगरमध्ये चाळ क्रमांक पाच येथे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास तीन मजली घर अचानक कोसळले. यामध्ये एकाच कुटुंबातील काही जण अडकले. स्थानिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. तर अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यासाठी त्वरित शोधमोहीम सुरू केली. मुसळधार पावसामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या.

    Maharashtra TimesVande Bharat : वेगवान वंदे भारतमुळे उड्डाणपुलावर फवारे, व्हिडिओ खरा की AI? ‘परे’-‘मरे’च्या परस्पर विरोधी दाव्यांनी संभ्रम
    रात्री ११च्या सुमारास सात जणांना बाहेर काढले. यातील पाच जणांना शताब्दी तर दोन जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शताब्दी रुग्णालयातील पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये चार महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. राजावाडी रुग्णालयात दाखल एका पुरुषाचा मृत्यू झाला. एक जण जखमी असून त्याच्यावर उपचार सूरू आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना घडली ती जागा जिल्हाधिकारी जागा असून त्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीसही बजावण्यात आल्याचे समजते. मात्र, त्यानंतरही ही जागा रिकामी करण्यात आली नव्हती. कोसळलेल्या घराच्या तळमजल्यावर गोडाऊनही होते.

    कुर्ला कमानी येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास गोम्स टाऊन इमारतीजवळ असलेल्या दुकानावर झाडाची मोठी फांदी कोसळली. या दुर्घटनेत युनुस कुंडावाला (६३) हे जबर जखमी झाले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. वांद्रे येथील मोतीलाल जवाहर नगर येथे राहणारे कुंडावाला यांनी कुर्ल्यात नवीन दुकान घेतले होते. या दुकानाच्या उद्घाटनच्या तयारीसाठी ते आले होते. अन्य एका घटनेत कुमार हसन रझा जहांगीर आलम सय्यद (१८) हा अंधेरी पूर्व येथे राहणारा तरुण दुपारी साडेतीनच्या सुमारास मित्रांसोबत आरे वसाहतीत फिरण्यासाठी दुचाकीवरून आला होता. युनिट क्रमांक १३ येथील रस्त्यावरून जात असता झाडाची एक फांदी त्याच्या डोक्यावर पडली. रुग्णालयात त्याला मृत घोषित केले.

    Maharashtra TimesMankhurd Building Collapse : मुंबईच्या मानखुर्दमध्ये हाहाकार, 6 जणांचा मृत्यू, तीन मजली बांधकाम कोसळल्याची घटना
    पाच लाखांची मदत
    कुर्ल्यातील घटनेनंतर महापालिकेचा एकही अधिकारी न फिरकल्याने मनसेच्या कार्यकत्यांनी तेथे आंदोलन केले. घटनेची माहिती मिळताच महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. कुंडावाला यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत तावडे यांनी जाहीर केली.

    घणसोली येथे विजेचा धक्का लागून बुद्धीराम प्रधान या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. वाशी सेक्टर-११ येथील जुहूगाव परिसरात असलेल्या ‘अपना ढाबा’ परिसरातील रस्त्यालगतच्या एका जुन्या इमारतीचा भाग रविवारी अचानक कोसळला. या दुर्घटनेत रस्त्यावरून जात असलेल्या सुमारे ३५ वर्षीय पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली आहे. अतिवृष्टीशी संबंधित घटनांमध्ये पनवेल तालुक्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक मुलगा बेपत्ता आहे.

    शाळांना आज सुट्टी
    मुंबईत आज, सोमवारी मुसळधार पाऊस आणि सोसायट्याचे वारे वाहतील, असा इशारा हवामान विभागाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच रायगड, रत्नागिरी येथील शाळांनाही आज, सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. तर, पालघरमध्ये सुट्टीबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनावर सोपवला

    विमानसेवेलाही ‘ब्रेक’
    मुंबईत रविवारी सकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसाचा आणि ताशी ४२ नॉट्स वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा फटका विमानसेवेलाही बसला. सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीवरील उड्डाणे आणि अवतरणाची प्रक्रिया सुमारे तासभर थांबविण्यात आली. यामुळे इंडिगोची चार उड्डाणे रद्द करण्यात आली.

    Maharashtra TimesSiya Goyal: ‘सिया पॉइंट’ पाहण्यासाठी लोहगडावर झुंबड; आता थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, काय मागणी केली?
    ठाणे जिल्ह्यात संततधार
    ठाणे : ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडीसह जिल्ह्यातील अन्य शहरात रविवारी पावसाची संततधार कायम होती. सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. ठाणे शहरात इमारतीच्या गॅलरीचा काही भाग तर दिव्यात इमारतीच्या जिन्याचा स्लॅब पडला. नवी मुंबईत रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले.

    गोवा महामार्गावर कोंडी
    रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाकण ते नागोठणे दरम्यान वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांना व प्रवाशांना तासनतास महामार्गावरच अडकून राहावे लागले. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २११.९० मिमी पावसाची नोंद झाली.

    धरणांमध्ये ‘पाणी’बेगमी
    मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणक्षेत्रांमध्ये वर्षभराच्या पाण्याची बेगमी होऊ लागली आहे. त्यामुळे शनिवारी सातही धरणातील असलेला ९.४१ टक्के पाणीसाठा रविवारी थेट १३ टक्क्यांवर पोहोचला. अप्पर वैतरणा धरणात शून्य टक्के असलेला पाणीसाठा रविवारी थेट चार टक्क्यांपर्यंत वाढला. विहार, तुळशी धरणक्षेत्रातही पाऊस चांगला बरसला असून मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा