Pune Rain Update: जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
नागरिकांनीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. नदी-नाले व धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे; तसेच स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.
पुणे शहर, जिल्ह्यासह घाट माथ्यावर पावसाने रविवारी जोरदार हजेरी लावली. दिवसभर संततधार, तर सायंकाळी मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले. सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने सुट्टीच्या दिवशी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती.
कर्जमाफी लांबणीवर, कोणत्या अटी माफ करणार? कृषीमंत्री भरणेंची मोठी माहिती
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक वातावरण मिळाले आहे. त्यामुळे सध्या पुण्यासह राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. शहर आणि परिसरात रविवारी पहाटेपासून हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्याने सूर्यदर्शन होऊ शकले नाही. शहराच्या विविध भागांत दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला.
पावसामुळे संपूर्ण शहरात वाहतूक संथ झाली होती. शहरात सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठपर्यंत ३१.८ मिलिमीटर पाऊस पडला. या मोसमात जूनपासून एका दिवसात सर्वाधिक पाऊस रविवारी नोंदवला.
पुढील दोन दिवस पावसाचे
अनुकूल वातावरणामुळे शहर आणि जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे. शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर जोरदार आणि अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे घाट माथ्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
Pune News: मावळात रस्ता फुटला? व्हायरल व्हिडिओबाबतचे सत्य अखेर समोर; विकासकामांचा भांडाफोड, टेस्टिंगमध्येच उघड झाला घोळ!
२५ गावांचा संपर्क तुटला
भोर : राजगड तालुक्यातील कोदवडी येथील तुटलेल्या पुलाला स्थानिकांनी तयार केलेला पर्यायी कच्चा रस्ता पावसामुळे पाण्याखाली गेल्याने २५ गावांचा संपर्क तुटला आहे. डिसेंबर २०२५मध्ये कोदवडी येथील गुंजवणी नदीवरील मुख्य पूल अवजड वाहनाचा भार सहन न झाल्यामुळे कोसळला. त्यामुळे २५ गावांचा संपर्क तुटला. तरुणांनी लोकसहभागातून श्रमदान करून पर्यायी कच्चा रस्ता तयार केला होता.
दरम्यान, वरंध घाटात उंबर्डे गावच्या हद्दीत रविवारी दुपारी दरड कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन दिवसांपूर्वी या मार्गावर शिरगावच्या हद्दीत दरड कोसळली होती. सध्या या रस्त्यावर अवजड वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
वाहतूक थांबवली
मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटातील डोंगरवाडी येथील प्लस व्हॅली पॉइंटजवळ ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने रविवारी (५ जुलै) रात्री राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली. पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला. पावसाळ्यात ताम्हिणी घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी हवामानाची माहिती घेऊनच प्रवास करावा; तसेच अतिवृष्टी किंवा पाणी रस्त्यावर आल्यास प्रवास टाळावा, असे आवाहन मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीने केले आहे.
Ethanol Mixed Fuel: इथेनॉल-मिश्रित इंधनामुळे वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड? देशभर चर्चा रंगताच ARAI संचालकांकडून खुलासा, नेमकं काय म्हणाले?
चोवीस तासांत महिन्याचे पाणी जमा
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या चोवीस तासात एक अब्ज घनफूटने (टीएमसी) पाणीसाठा वाढल्याने शहराला महिनाभर पुरेल इतके पाणी जमा झाले आहे. पानशेत येथे सर्वाधिक ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, साखळी प्रकल्पातील पाणीसाठा ५.७२ टीएमसी (१९.६३ टक्के) झाला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत या धरणांतील पाणीसाठा अजूनही कमी आहे. गेल्या वर्षी पाच जुलै रोजी चारही धरणांमध्ये १७.६७ टीएमसी (६०.६२ टक्के) इतका पाणीसाठा होता.
कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. या हंगामात पंचगंगा नदीचे पाणी प्रथमच पात्राबाहेर आले आहे. पाणी पातळी ३१ फुटांवर पोहोचले असून, जिल्ह्यातील ३३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाल्याने नृसिंहवाडी येथील दत्त मंदिराजवळ पाणी पोहोचले आहे. दरम्यान, महाबळेश्वर व पाचगणी शहरांचा प्रमुख जलस्रोत असलेला वेण्णा तलाव रविवारी दुपारी पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला.
