• Sat. Jul 4th, 2026

    Nagpur News: एकच फुफ्फुस, एकच किडनी आणि उजव्या बाजूला हृदय; नागपूरमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी, २२ वर्षीय तरुणाला नवजीवन

    Nagpur News: एकच फुफ्फुस, एकच किडनी आणि उजव्या बाजूला हृदय; नागपूरमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी, २२ वर्षीय तरुणाला नवजीवन

    Nagpur Robotic Heart Surgery: सुमारे दोन तास चाललेल्या या जटिल शस्त्रक्रियेत डॉक्टरांना पूर्ण यश मिळाले आणि रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यात आली.

    एकच फुफ्फुस, एकच किडनी आणि उजव्या बाजूला हृदय; नागपूर मेडिकलची रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : मध्य भारतातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयांपैकी एक असलेल्या नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. अत्यंत दुर्मिळ शारीरिक रचना असलेल्या २२ वर्षीय तरुणावर रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. रुग्णाच्या शरीरात एकच फुफ्फुस, एकच किडनी होती आणि त्याचे हृदयही नेहमीच्या जागेऐवजी उजव्या बाजूला व फुफ्फुसाच्या खाली होते. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत डॉक्टरांनी अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करत रुग्णाला नवजीवन दिले.

    नागपूर येथील २२ वर्षीय साहिल सहारे हा गेल्या काही काळापासून श्वास घेण्यास त्रास होणे आणि हृदयाचे ठोके अनियमित व वेगाने धडधडण्याच्या समस्येने त्रस्त होता. तपासणीनंतर त्याला एट्रियल फिब्रिलेशन (Atrial Fibrillation) हा गंभीर हृदयविकार असल्याचे निदान झाले. या आजारात हृदयाची गती अनियमित होते आणि रक्ताच्या गाठी (ब्लड क्लॉट्स) तयार होण्याचा धोका वाढतो. या गाठी मेंदूपर्यंत पोहोचल्यास पक्षाघात (स्ट्रोक) किंवा लकव्यासारखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, डॉक्टरांसमोरचे सर्वात मोठे आव्हान केवळ आजार नव्हते, तर रुग्णाची अत्यंत दुर्मिळ शारीरिक रचना होती.

    साहिलच्या शरीरात जन्मतःच एकच फुफ्फुस आणि एकच किडनी होती. शिवाय त्याचे हृदय डाव्या बाजूऐवजी उजव्या बाजूला आणि फुफ्फुसाच्या खाली स्थित होते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया करणे अत्यंत धोकादायक ठरू शकत होते. रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेऊन वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनील वाशिमकर यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या पथकाने डॉ. अविनाश वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक रोबोटिक पल्स फील्ड एब्लेशन (Robotic Pulse Field Ablation) तंत्राचा वापर केला.

    या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल डॉ. सुनील वाशिमकर यांनी सांगितले की, “खासगी रुग्णालयांमध्ये याच प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी साधारण ८ ते १० लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र नागपूर मेडिकलमध्ये ही अत्याधुनिक उपचारपद्धती यशस्वीपणे उपलब्ध करून देण्यात आली असून, शासकीय रुग्णालयांमध्येही उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा दिल्या जाऊ शकतात, हे या कामगिरीतून सिद्ध झाले आहे. एकच फुफ्फुस, एकच किडनी आणि शरीराच्या उजव्या बाजूला असलेले हृदय अशा अत्यंत दुर्मिळ शारीरिक रचनेच्या रुग्णावर रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करून नागपूर मेडिकलने वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे.”

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा