• Thu. Jul 2nd, 2026

    ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे भक्ती, संस्कृती, परंपरेचा दिव्य आविष्कार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 2, 2026
    ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे भक्ती, संस्कृती, परंपरेचा दिव्य आविष्कार – महासंवाद

    • अध्यात्म आणि कलेचा अनुभव घेण्याची अनोखी संधी

    मुंबई, दि. २: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, अध्यात्म आणि परंपरेचा गौरव जनमानसापर्यंत पोहोचविणे तसेच सांस्कृतिक मूल्यांविषयी जनजागृती करणे, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

    ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ हा भारतीय सांस्कृतिक अस्मिता, अखंड श्रद्धा आणि आध्यात्मिक परंपरेचा गौरव करणारा महत्वपूर्ण उपक्रम आहे. या पर्वाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीच्या शाश्वत मूल्यांची जपणूक करण्याबरोबरच भावी पिढीपर्यंत आपल्या परंपरा आणि संस्कारांचा वारसा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

    या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांचे विशेष सादरीकरण होणार असून, त्यांच्या प्रभावी अभिव्यक्ती आणि कलात्मक सादरीकरणातून भक्ती, अध्यात्म, संस्कृती आणि भारतीय परंपरेचे विविध पैलू रसिकांसमोर उलगडले जाणार आहेत.

    भारतीय संस्कृतीमध्ये मंदिर परिसर हा केवळ धार्मिक श्रद्धेचा केंद्रबिंदू नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य घटक राहिला आहे. त्र्यंबकेश्वरच्या पवित्र आणि ऐतिहासिक वातावरणात सादर होणारा हा कार्यक्रम अध्यात्म आणि कलेचा सुंदर मिलाफ अनुभवण्याची संधी उपस्थितांना उपलब्ध करून देणार आहे.

    कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय भक्तीपरंपरेतील विविध भावविश्व, आध्यात्मिक विचार आणि सांस्कृतिक मूल्यांचे कलात्मक दर्शन घडणार आहे. संगीत, अभिव्यक्ती आणि सांस्कृतिक सादरीकरणाच्या माध्यमातून भारतीय परंपरेतील समन्वय, सहिष्णुता आणि अध्यात्मिकतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात येणार आहे.

    त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पवित्र परिसरात आयोजित हा कार्यक्रम उपस्थितांना सांस्कृतिक वारशाचा अनुभव देण्याबरोबरच भारतीय संस्कृतीतील अध्यात्मिक समृद्धी आणि परंपरेची जाणीव अधिक दृढ करणारा ठरणार आहे. श्रद्धा, संस्कृती आणि कला यांचा संगम असलेला हा कार्यक्रम रसिकांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरण्याची अपेक्षा आहे.

    हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीतील अध्यात्म, श्रद्धा आणि परंपरेचा गौरव समाजापर्यंत पोहोचविणे, सांस्कृतिक मूल्यांचे जतन व संवर्धन करणे तसेच आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

    या कार्यक्रमास सर्व नागरिकांसाठी विनामूल्य असून, त्र्यंबकेश्वरच्या पावन भूमीत साकार होणाऱ्या भक्ती, संस्कृती आणि परंपरेच्या या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी भाविक, कला रसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

    0000

    संजय ओरके/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed