• Tue. Jun 30th, 2026

    विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 30, 2026
    विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद

    नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार – मंत्री उदय सामंत 

    मुंबई, दि. ३० : नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

    याबाबत सदस्य भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य परिणय फुके यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

    मंत्री उदय सामंत म्हणाले, पाणी गुणवत्ता तपासणी, पाईपलाईन दुरुस्ती, जलशुद्धीकरण व्यवस्था आणि वितरण प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात येतील. तसेच पर्यावरण विभागालाही दूषित पाणी पुरवठ्यामुळे होणाऱ्या परिणामांची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील. संबंधित कंपनीने करारातील अटींची पूर्तता केली आहे का, याची सखोल पडताळणी केली जाईल. अटींचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास कंपनीविरुद्ध कराराचा पुनर्विचार किंवा आवश्यक ती कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

    या प्रश्नावर नागपूर शहरातील आमदारांची समिती स्थापन करून सविस्तर अभ्यास केला जाईल. नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून, कोणत्याही रहिवाशावर अन्याय होणार नाही याची शासन पूर्ण काळजी घेईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

    0000

    शैलजा पाटील/विसंअ

    दिनदयाळ अंत्योदय योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार – मंत्री उदय सामंत

    मुंबई, दि. ३० : शहरी भागातील गरीब, बेघर आणि अत्यंत गरजू कुटुंबांसाठी राबविण्यात येणाऱ्या दिनदयाळ अंत्योदय योजनेच्या प्रलंबित निधीसाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत असून, केंद्राचा निधी प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाचा हिस्सा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल

    अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

    याबाबत सदस्य हेमंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रविण दरेकर, अभिजीत वंजारी यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

    मंत्री उदय सामंत म्हणाले, एक लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ही योजना केंद्र शासनाच्या ६० टक्के आणि राज्य शासनाच्या ४० टक्के आर्थिक सहभागातून सुरू करण्यात आली. सध्या केंद्र शासनाकडून सुमारे ७८ कोटी रुपयांचा निधी प्रलंबित आहे. या निधीसाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

    ते पुढे म्हणाले की, ही योजना राज्य शासनाची नसून केंद्र शासनाची आहे. त्यामुळे केंद्राचा निधी उपलब्ध न झाल्यामुळेच ही आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडे पुन्हा एकदा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येईल. केंद्राचा ६० टक्के निधी प्राप्त होण्यापूर्वी राज्याचा ४० टक्के हिस्सा देता येईल का, याबाबत तांत्रिक पडताळणी करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

    0000

    शैलजा पाटील/विसंअ

    पाषाण एसटीपी प्रकल्पातील कामाची चौकशी करू; नियम न पाळणाऱ्या सोसायट्यांवर कारवाई – मंत्री उदय सामंत

    मुंबई, दि. ३० : पुणे शहरातील पाषाण येथील सांडपाणी शुद्धीकरण (एसटीपी) प्रकल्पातील कामाची चौकशी करण्यात येईल. तसेच सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा कार्यान्वित न ठेवणाऱ्या सोसायट्यांना अंतिम १५ दिवसांची नोटीस देऊनही नियमांचे पालन न झाल्यास त्यांचे नळजोड तोडण्याचे निर्देश दिले जातील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

    पाषाण येथील एसटीपी प्रकल्पातून पाण्याचे पुरेसे शुद्धीकरण होत नसल्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला.

    मंत्री उदय सामंत  म्हणाले, पाषाण येथील प्रकल्पासाठी २३ सप्टेंबर २०२२ रोजी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती. फेरनिविदा प्रक्रियेनंतर सुमारे ४.३१ कोटी रुपयांचे काम मे.परशुराम कन्स्ट्रक्शनला  देण्यात आले. काही कालावधीसाठी देखभाल-दुरुस्तीमुळे एसटीपी प्रकल्प बंद होता; मात्र सध्या तो कार्यान्वित आहे. तरीही कामाच्या मुदती, देखभाल-दुरुस्ती आणि दोषदायित्व कालावधीबाबत काही त्रुटी झाल्या आहेत का, याची चौकशी करण्यात येईल.

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १२६ पैकी ६२ सोसायट्यांना त्यांच्या सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा कार्यान्वित नसल्याने नोटिसा बजावण्यात आल्या असून २४ सोसायट्यांचे नळजोड तोडण्यात आले आहेत. उर्वरित सोसायट्यांना अंतिम १५ दिवसांची मुदत देण्यात येईल. त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास त्यांच्या नळजोडांवरही कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

    00000

    मोहिनी राणे/स.सं

    नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मंत्री उदय सामंत

    मुंबई, दि. ३० :  नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी आवश्यक विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून कोणत्याही कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

    नाशिक कुंभमेळ्यासाठी विविध विकासकामांना सविस्तर प्रकल्प अहवालअभावी प्रशासकीय मंजुरी दिल्याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी सदस्य पंकज भुजबळ यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

    मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत एकूण ३४ हजार ७३२.३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे.

    कुंभमेळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला आवश्यकतेनुसार कामांमध्ये बदल करणे तसेच नवीन कामांचा समावेश करण्याचे अधिकार देण्यात आले असल्याने या कामांसाठी स्वतंत्र डीपीआरची आवश्यकता नसल्याचेही मंत्री सामंत यांनी यावेळी नमूद केले.

    रस्ते रुंदीकरण व नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचे नियोजन असून त्यापैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352.57 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659.47 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    ऑक्टोबरपासून कुंभमेळ्याच्या प्रारंभिक कार्यक्रमांना सुरुवात होणार असल्याने विकासकामे एकाचवेळी सुरू आहेत. मात्र, वाहतुकीत अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या जातील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. तसेच, सदस्य सत्यजित तांबे यांनी सुचविल्याप्रमाणे लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याबाबत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी नमूद केले.

    00000

    मोहिनी राणे/स.सं

    माणगाव तालुका क्रीडा संकुल वर्षभरात पूर्ण होणार – मंत्री आदिती तटकरे

    मुंबई, दि. ३० : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका क्रीडा संकुलाचे काम वर्षभराच्या आत पूर्ण करण्यात येणार असून, माणगाव येथे अत्याधुनिक सुविधा असलेले उप-विभागीय क्रीडा संकुल उभारण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात येईल, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य प्रविण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य अनिकेत तटकरे, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

    मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, माणगाव हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून, २०२० च्या चक्रीवादळात तालुका क्रीडा संकुलाचे नुकसान झाले होते. त्यानंतर विभागीय क्रीडा संकुलासाठी २४ एकर जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली असून, ८५ कोटी रुपयांचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, खारघर येथे विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रस्तावामुळे हा विषय प्रलंबित राहिला. या कालावधीत माणगाव तालुका क्रीडा संकुलासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी २ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या कामाला गती देण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

    खारघर येथे विभागीय क्रीडा संकुल उभारले जात असले तरी माणगावमध्ये विशेष बाब म्हणून उप-विभागीय क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येईल. या संकुलात स्विमिंग पूल, क्रिकेटसह विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    माणगाव विभागीय क्रीडा संकुलासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. डोंगरी भागातील क्रीडा संकुलांच्या विकासासाठी विशेष धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच रत्नागिरीतील क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त निधीच्या प्रस्तावाचा विचार करून आवश्यक तरतूद करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.

    0000

    शैलजा पाटील/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *