• Tue. Jun 30th, 2026

    जिल्ह्यात नाविण्यपूर्ण काम करण्याची संधी – पालक सचिव धीरज कुमार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 29, 2026
    जिल्ह्यात नाविण्यपूर्ण काम करण्याची संधी – पालक सचिव धीरज कुमार – महासंवाद

    यवतमाळ,दि. 30 : जिल्ह्यात नाविण्यपूर्ण काम करण्याची प्रचंड संधी आहे. या संधीचा फायदा घेवून जिल्ह्यात लोकोपयोगी नाविण्यपूर्ण काम करावे, असे निर्देश पालक सचिव धीरज कुमार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

                पालकमंत्री संजय राठोड यांच्या निर्देशानुसार त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत त्यांनी जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीला अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, सहायक जिल्हाधिकारी रेवैयाह डोंगरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपविभागीय अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

                पालक सचिव धीरज कुमार पुढे म्हणाले, जिल्हा प्रशासन व इतर विभागांचे काम चांगले सुरु आहे. जिल्ह्यात काम करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी टीम म्हणून काम करावे. लोककेंद्रीत प्रशासन राबवून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे निर्देश पालक सचिव धीरज कुमार यांनी दिले.

    मिशन उभारी, सुपर ५० उपक्रमाचे कौतुक

                जिल्हा प्रशासनामार्फत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन उभारी’ आणि गुणवंत विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट परीक्षांचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठीच्या ‘सुपर ५०’ उपक्रमाचे पालक सचिव धीरज कुमार यांनी कौतूक केले.

    राज्याच्या जीडीपीत यवतमाळचा टक्का वाढवा

                केंद्र व राज्य शासनाने ‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र २०४७’  अंतर्गत ३ ट्रिलियन डॅालरपर्यंत अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टानुसार देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी राज्याच्या जीएसडीपीत यवतमाळ जिल्ह्याचा टक्का वाढला पाहिजेत. त्यासाठी सर्व विभागांनी आराखडा तयार करावा, असे निर्देशही पालक सचिव धीरज कुमार यांनी दिले.

    लाभार्थ्यांना प्रमाणपत्र

                पालक सचिव धीरज कुमार यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवादही साधला.

                या बैठकीत पालक सचिव यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. त्यामध्ये पाऊसपाणी, पेरणी, बीबियाणे उपलब्धता, खतांचा पुरवठा व वाटप, पीक कर्ज वाटप, कर्जमुक्ती योजना, मिशन उभारी, जलयुक्त शिवार योजना, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, कुपोषण मुक्त अंगणवाडी, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, ॲग्रिस्टॅक, पीक विमा, रोहयो, धान खरेदी, रास्त भाव दुकान, इंधन न गॅस वितरण, स्वच्छ भारत अभियान, वर्धा-नांदेड रेल्वे प्रकल्प, जिल्हा खनिज प्रतिष्ठाण, वन जमीन, अभिप्राय कक्ष, सिमांकन, सॅंड मॅप, गाव तिथे वाचनालय, जिल्हा वार्षिक योजना, सुपर ५० उपक्रम, आकांक्षित तालुका कार्यक्रम आणि शासनाकडे प्रलंबित प्रस्ताव इ. विषयांचा आढावा घेत सविस्तर चर्चा करुन आवश्यक सूचना केल्या.

                यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील विभागांच्या कामांची माहिती दिली.

    000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed