• Fri. Aug 14th, 2026

    लखनौच्या भूमीत महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा भव्य आविष्कार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 14, 2026

    मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्यावतीने उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे आयोजित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्यात येणार आहे. महाराष्ट्राची भक्तीपरंपरा, लोककला, लोकसंस्कृती, सण-उत्सव आणि ऐतिहासिक वैभव यांचा कलात्मक आविष्कार ‘नमन व दिंडी नृत्य’ या विशेष सादरीकरणातून करण्यात येणार आहे.

    महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा देशाच्या विविध भागांत परिचय करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील कलाकारांचे विशेष पथक लखनौ येथे दाखल झाले आहे. हे सांस्कृतिक सादरीकरण सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात येणार आहे.

    ‘नमन व दिंडी नृत्य’ या सादरीकरणाची सुरुवात गणेशवंदना असलेल्या ‘नमन’ या पारंपरिक कलाप्रकाराने होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची भक्तीपरंपरा, लोकजीवन आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित करणारे दिंडी नृत्य सादर करण्यात येणार आहे. भक्तिभाव, पारंपरिक नृत्यशैली, लोकसंगीत आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक ऊर्जा यांचा सुरेख संगम या सादरीकरणातून अनुभवता येणार आहे.

    या विशेष सांस्कृतिक सादरीकरणाचे टीम लीडर व नृत्यदिग्दर्शक ओंकार भास्कर रोकडे यांच्या नेतृत्वाखाली कलाकार सहभागी झाले आहेत. पारंपरिक नृत्य, वेशभूषा, भक्तिमय भाव आणि लोकपरंपरेतील कलाविष्कार यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रभावी दर्शन रसिकांना घडणार आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याबरोबरच राज्यातील विविध लोककला व सांस्कृतिक परंपरांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. विविध राज्यांतील सांस्कृतिक परंपरांचे आदान-प्रदान वाढविणे आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला बळकटी देणे, यासाठी अशा सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या कला, भक्ती आणि लोकपरंपरेचा देशाच्या विविध भागांत परिचय करून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

    या सांस्कृतिक पथकात टीम लीडर व नृत्यदिग्दर्शक ओंकार भास्कर रोकडे यांच्यासह कनक दावरी, प्राची कांबळे, स्वालिया विजापुरे, सोनाली सुतार, रिद्धी मेहर, आर्या कदम, पूनम मगदूम, वैष्णवी वरक, ऋतुजा पाटील आणि बियांका पाटील तसेच बबन शिंदे, प्रज्योत पाटील, आशुतोष चव्हाण, विकास कांबळे, ऋषिकेश चौधरी, सौरभ रोकडे, कहान दावरी, अरहम शेख, अजय काटे, पवन जोशी, बाहुबली राजमाने आणि ओंकार रोकडे सहभागी झाले आहेत.

    लखनौ येथे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण करणारे हे विशेष पथक चार दिवस मुक्काम करून कार्यक्रमाच्या तयारीसह सांस्कृतिक सादरीकरणात सहभागी होत आहे. या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची ओळख उत्तर प्रदेशातील रसिकांना करून देण्याबरोबरच विविधतेतून एकतेचा आणि सांस्कृतिक बंधुभावाचा संदेश दिला जाणार आहे.

    0000

    संजय ओरके/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed