• Fri. Jun 26th, 2026

    Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी २५० कोटी गोळा? आरोपावर मंत्री नरहरी झिरवाळांचा खुलासा, मुंढेंबद्दल काय म्हणाले?

    Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी २५० कोटी गोळा? आरोपावर मंत्री नरहरी झिरवाळांचा खुलासा, मुंढेंबद्दल काय म्हणाले?

    Narhari Zirwal: दूध भेसळखोरांच्या विरोधात मकोका कायद्याखाली कारवाई व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे विधेयक आणणार असल्याचे झिरवाळ यांनी सांगितले.

    तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी २५० कोटी गोळा केले? आरोपावर मंत्री नरहरी झिरवाळांचा खुलासा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील बेकायदा गुटखा विक्री, अन्नपदार्थांमधील भेसळ, बोगस औषधांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केल्याने चर्चेत आलेला अन्न आणि औषध प्रशासन विभाग (एफडीए) आवश्यक संसाधनांविना अभावग्रस्त असल्याची कबुली विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ, अधिकाऱ्यांना लागणारी वाहने, कार्यालये आणि अन्न तपासणीच्या प्रयोगशाळा नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काशिनाथ दाते यांनी बुधवारी विधानसभेत अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीने सुरू असलेल्या धाडसत्राबद्दल लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या जोरदार चर्चेला उत्तर देताना झिरवाळ यांनी विभागात असलेल्या कमतरतेची माहिती दिली. ‘विभागातील ३५० मंजूर पदांपैकी ३१६ कार्यरत असून ४३ रिक्त आहेत. औषध निरीक्षकांची २०० पदे मंजूर असून यापैकी १५९ पदे भरलेली नाहीत. अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची १९७ पदे भरली आहेत. औषध निरीक्षक पदासाठी ४०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार एक हजार अन्न आस्थापनांना एका अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. त्यानुसार राज्यात ११०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. जिल्हास्तरावर विभागाची कार्यालये नाहीत’, अशी खंत झिरवाळ यांनी व्यक्त केली.

    ‘‘एफडीए’ची स्वतःची अशी प्रयोगशाळा नाही. सध्या करार केलेल्या २२ प्रयोगशाळांकडून अन्न नमुन्यांची तपासणी केली जाते. नाशिक, पुणे, नागपूर आणि यवतमाळ येथे विभागाची स्वतःची प्रयोगशाळा लवकरच सुरू केली जाईल. तर रायगड येथील पेण आणि यवतमाळसाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. अधिकाऱ्यांसाठी विभागाकडे स्वतःची अशी वाहने नाहीत. त्यामुळे विभागाच्या बळकटीकरणासाठी भाडेतत्त्वावर वाहने घेतली जातील. विभागासाठी नवी पदे निर्माण होत नसल्याने खालची यंत्रणा काम करत नाही’, हे झिरवाळ यांनी मान्य केले.

    ‘मुंढेंच्या बदलीसाठी २५० कोटी गोळा’
    अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यासाठी औषध कंपन्यांनी २५० कोटी रुपये गोळा केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला. या प्रश्नाला उत्तर देताना, मुंढे हे चांगले काम करत असून त्यांना थांबवले जाणार नाही अथवा त्यांची बदली केली जाणार नसल्याचे झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा