• Fri. Jun 26th, 2026

    महाराष्ट्रात IPS अधिकाऱ्यांची बदली, विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त

    महाराष्ट्रात IPS अधिकाऱ्यांची बदली, विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त

    महाराष्ट्रात IPS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. विश्वासन नांगरे पाटील यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर नागपूरचे सध्याचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची विश्वास नांगरे पाटील यांच्या सध्याच्या विद्यमान पदावर बदली करण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : राज्यातील पोलीस प्रशासनात मोठा बदल करत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरच्या नवीन पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. सध्याचे नागपूरचे पोलीस आयुक्त असलेले डॉ. रवींद्र सिंगल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागात (एसीबी) अपर पोलीस महासंचालक (एडीजी) म्हणून नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विश्वास नांगरे-पाटील हे याच पदावर कार्यरत होते.

    १९९७ च्या महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी असलेले विश्वास नांगरे-पाटील हे राज्यातील सर्वाधिक चर्चित आणि लोकप्रिय पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात. कठोर कार्यपद्धती, गुन्हेगारीविरोधातील आक्रमक भूमिका आणि तात्काळ निर्णयक्षमतेमुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे नागपूर पोलीस दलाला नव्या नेतृत्वाची दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

    नांगरे-पाटलांची ‘महाराष्ट्राचे सिंघम’ म्हणून ख्याती

    विश्वास नांगरे-पाटील यांना ‘महाराष्ट्राचे सिंघम’ म्हणून ओळखले जाते. केवळ कार्यालयीन कामकाजापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष मैदानात उतरून कारवाई करण्याची त्यांची शैली नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. सोशल मीडियावरही त्यांचे मोठे चाहते असून अनेक युवक त्यांना प्रेरणास्थान मानतात.

    २६/११ हल्ल्यात बजावलेली मोलीची भूमिका

    २००८ मध्ये झालेल्या मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यादरम्यान विश्वास नांगरे-पाटील यांनी बजावलेली भूमिका विशेष चर्चेत राहिली होती. त्या काळात दक्षिण मुंबईत कार्यरत असताना त्यांनी जीवाची पर्वा न करता बचाव आणि मदत कार्यात सहभाग घेतला होता. या घटनेनंतर त्यांची राज्यभरात एक धाडसी अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली.

    याशिवाय, त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत असताना संघटित गुन्हेगारी, खंडणीखोरी, अवैध वसुली आणि गुन्हेगारी टोळ्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवल्या. अवैध दारू, अमली पदार्थांची तस्करी आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवरही त्यांनी कठोर कारवाई केली. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या अनेक मोहिमांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते.

    विश्वास नांगरे-पाटील यांच्यापुढे आव्हाने काय?

    नागपूरसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या महानगरात नवीन पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे-पाटील यांच्यासमोर अनेक आव्हाने असणार आहेत. शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्ते सुरक्षा, सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, अमली पदार्थांच्या नेटवर्कविरोधातील कारवाई, महिलांची सुरक्षा आणि शहराच्या वाढत्या विस्तारासोबत कायदा-सुव्यवस्था राखणे ही प्रमुख आव्हाने असतील. तसेच, स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नागपुरात तंत्रज्ञानाधारित पोलीस व्यवस्था, आधुनिक निगराणी यंत्रणा आणि डिजिटल गुन्हेगारीविरोधात प्रभावी उपाययोजना राबविण्यावरही त्यांचा भर राहण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, नांगरे-पाटील यांच्या नियुक्तीमुळे नागपूर पोलीस दलात नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कठोर प्रशासनशैलीचा शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

    राज्यातील आणखी 10 बड्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली

    • छत्रपती संभाजीनगर शहर येथील पोलीस उपआयुक्त म्हणून कार्यरत असलेले प्रशांत मोहिते यांची नवी मुंबईचे पोलीस उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
    • हिंगोलीचे पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांची नांदेडचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
    • नांदेडचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची पुणे शहर पोलीस उपआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
    • बुलढाण्यातील खामगाव येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्रेणिक लोढा यांची हिंगोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
    • नवी मुंबई येथे पोलीस उपआयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या रुपाली अंबुरे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
    • नागपूर शहरातील पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव यांची छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस उपआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
    • अमरावती शहरातील पोलीस उपआयुक्त रमेश धुमाळ यांची नागपूर शहर पोलीस उपआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
    • चंद्रपूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 17 चे समादेशक पीयूष जगताप यांची बुलढाण्यातील खामगाव येथे अपर पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
    • गडचिरोली येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 चे समादेशक नारायण शिरगांवकर यांची अहिल्यानगर जिल्ह्यातील कुसळगाव येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 19 चे समादेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
    • अमरावती येथे पोलीस अधीक्षक (गुन्हे) म्हणून कार्यरत असलेल्या प्रांजली सोनवणे यांची अमरावती शहर पोलीस उपआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा