• Thu. Jun 25th, 2026

    प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 22, 2026
    प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    मुंबई, दि. २२ : फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात ‘वेदर स्टेशन‘ बसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

    पालघर जिल्ह्यातील हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील अनियमितता, शेतकऱ्यांना न मिळालेली नुकसानभरपाई आणि प्रलंबित तक्रारींबाबत मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत कृषिमंत्री बोलत होते. या बैठकीला आमदार मनीषा चौधरी, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, विमा कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

    डहाणू आणि बोईसर येथील शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरूनही त्यांची नोंदणी पूर्ण झाली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी जिल्हाधिकारी पालघर यांनी करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले.प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारण्यासाठी शासन आग्रही आहे. गावागावात हवामान केंद्र झाल्यास, निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रत्यक्ष झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचा आकडा आणि विम्याचे निकष यांची तंतोतंत जुळवणी करणे शक्य होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळेल असेही कृषीमंत्री भरणे म्हणाले.

    विमा कंपन्या, बँका आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपापसातील समन्वय वाढवून प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. कोणताही पात्र शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे कडक निर्देशही कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी दिले.

    0000

    संध्या गरवारे/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed