• Mon. Jun 22nd, 2026
    Uddhav Thackeray : बंड तर झालं… पण खेळ अजून संपलेला नाही; उद्धव ठाकरेंनी टाकली पुढची चाल

    ​Uddhav Thackeray News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संभाव्य फुटीच्या चर्चांदरम्यान उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षातील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली असतानाच ठाकरे यांनी या सर्व खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा जाहीर केला आहे. 26 जून ते 29 जून या कालावधीत ते थेट कार्यकर्त्यांमध्ये जाऊन पक्षबांधणीचा संदेश देणार आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. पक्षातील सहा खासदार फुटीच्या मार्गावर असल्याच्या चर्चांदरम्यान आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची रणनीती त्यांनी आखली असून त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेमुळे संपूर्ण समीकरण बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

    उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नऊ लोकसभा खासदार असून त्यापैकी सहा जण स्वतंत्र गट स्थापन करून पुढे शिंदे गटात विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी संघटन मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी दौऱ्याची आखणी केली आहे.

    26 जूनपासून दौरा

    26 जून रोजी सुरू होणाऱ्या या दौऱ्यात 27 जूनला यवतमाळ-वाशिम आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यानंतर 28 जून रोजी ते परभणी आणि धाराशिवमध्ये कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. दौऱ्याचा समारोप 29 जून रोजी शिर्डी लोकसभा मतदारसंघात होणार असून तेथेही कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे.

    Maharashtra TimesMaharashtra Assembly Monsoon Session : विरोधी पक्षांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, ‘या’ मुद्द्यांवरुन अधिवेशन गाजणार

    पक्ष सोडण्याच्या चर्चांमध्ये असलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न असणार आहे. तसेच स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या पाठीशी पक्ष नेतृत्व ठामपणे उभे असल्याचा संदेश देण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबईसह विविध भागांत शिवसैनिकांनीही मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा आहे.

    नेतृत्वावर प्रश्न, ठाकरेंचे प्रत्युत्तर

    सहा खासदारांच्या संभाव्य बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विरोधकांसह काही नाराज नेत्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पक्षप्रमुख भेटत नाहीत, फोन घेत नाहीत आणि स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होते, अशा तक्रारी वारंवार पुढे आल्या आहेत. तसेच आदित्य ठाकरे मतदारसंघांच्या दौऱ्यांपेक्षा मुंबईतच अधिक सक्रिय असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

    मात्र 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी या सर्व आरोपांना अप्रत्यक्ष उत्तर दिले. “जोपर्यंत माझ्यासमोर लाखो शिवसैनिक उभे आहेत, तोपर्यंत मी नेतृत्व करत राहणार आणि लढत राहणार. मात्र शिवसैनिकांनीच थांबण्यास सांगितले, तर मी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासही तयार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले होते.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा