• Thu. Sep 3rd, 2026

योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा : कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 21, 2026
योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा : कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन – महासंवाद

नाशिक, दि. २१ जून (जिमाका वृत्तसेवा): भारताच्या ऋषी-मुनींनी जगाला दिलेली योग ही अमूल्य देणगी आज संपूर्ण जगाने स्वीकारली आहे. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारी जीवनशैली असून तणावमुक्त, निरोगी, सशक्त आणि सकारात्मक जीवनाची गुरूकिल्ली आहे. असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज नाशिक महानगरपालिका व सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भोईर मळा, महादेव कॉलनी समोर, मखमलाबाद रोड येथील वन उद्यानात आयोजित योग दिन कार्यक्रमात मंत्री महाजन बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके, महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त अमित रंजन, अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी, योगशिक्षिका प्रज्ञा पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, मान्यवर, विद्यार्थी व नागारिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुंभमेळा मंत्री श्री. महाजन म्हणाले की, योगाचे महत्त्व आज भारताच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचले आहे. जगातील जवळपास प्रत्येक देशात योगाचा प्रसार झाला असून भारताने जगाला आरोग्य, शांती आणि संतुलनाचा संदेश दिला आहे. याचे मोठे श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केला आणि भारताच्या प्राचीन योग परंपरेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली.

ते पुढे म्हणाले की, आधुनिक जीवनशैलीमुळे तणाव, नैराश्य, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत योग हा सर्वात प्रभावी, सुलभ आणि नैसर्गिक उपाय ठरतो. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न राहते, विचार सकारात्मक होतात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक बनतो. योग केवळ शारीरिक स्वास्थ्य देत नाही, तर मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि आत्मशक्तीही वाढवितो. त्यामुळे योग हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. विशेषतः युवा पिढीने योगाला जीवनशैली म्हणून स्वीकारणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर हिमगौरी आडके म्हणाल्या की, भारत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी निरोगी, सक्षम आणि सकारात्मक समाजाची आवश्यकता आहे. योग हीच त्या निरोगी समाजाची भक्कम पायाभरणी आहे. प्रत्येक नागरिक निरोगी असेल तर देश अधिक सक्षम बनेल आणि विकासाचा वेग अधिक वाढेल. योग हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता वर्षातील प्रत्येक दिवस योगाचा दिवस बनविण्याची गरज आहे. कुटुंब, मित्रपरिवार आणि समाजात योगाबाबत जनजागृती करून प्रत्येक घरात, गावात आणि शहरात योगाचा संदेश पोहोचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कुंभमेळा मंत्री महाजन यांच्या संकल्पनेतून मखमलाबाद शिवारात वृक्षारोपणाद्वारे विकसित करण्यात आलेल्या वन उद्यानात हा योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निसर्गरम्य वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात नाशिक शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, परिसरातील नागरिक, महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी तसेच कैलास मठ येथील वेधशाळेतील विद्यार्थी-साधक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सामूहिक योगाभ्यास केला. योग शिक्षिका श्रीमती पाटील यांनी योगाची विविध प्रात्यक्षिक उपस्थितांकडून करवून घेतली.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed