• Fri. Jun 19th, 2026

    Mumbai News : गोवंडीतल्या बालरुग्णालयात नेमकं काय सुरु होतं? FDAच्या छाप्यानंतर उघड झालं धक्कादायक सत्य

    Mumbai News : गोवंडीतल्या बालरुग्णालयात नेमकं काय सुरु होतं? FDAच्या छाप्यानंतर उघड झालं धक्कादायक सत्य

    FDA Action In Govandi, Mumbai : गोवंडीतील एका बालरोगतज्ञाच्या रुग्णालयावर एफडीएची धडक कारवाई पाहायला मिळाली आहे. येथे सुरु असलेल्या प्रकारानंतर पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणाहून ९ लाखांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबईतील गोवंडी परिसरातील एका बालरोगतज्ञाच्या रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत परवान्याविना सुरू असलेली अॅलोपॅथिक औषधविक्री उघडकीस आणली. तपासणीदरम्यान सुमारे ९.०९ लाख रुपयांचा औषधसाठा आणि विक्रीसाठी वापरले जाणारे बिल बुक जप्त करण्यात आले. या प्रकरणामुळे आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि औषधांची कायदेशीर विक्री सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत १८ जून रोजी गोवंडी पूर्व येथील मुस्कान एनआयसीयू अॅण्ड चिल्ड्रन हॉस्पिटलची तपासणी करण्यात आली. तपासणीत रुग्णालयाचे संचालक डॉ. निलेश शाह यांनी दोन स्वतंत्र खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अॅलोपॅथिक औषधांचा साठा करून ठेवल्याचे आढळले. विशेष म्हणजे वैध औषध विक्री परवाना नसतानाही रुग्णालयातील बारावी उत्तीर्ण रिसेप्शनिस्टमार्फत औषधांची विक्री केली जात असल्याचे समोर आले.

    बिलांमध्येही गंभीर त्रुटी

    एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान औषधविक्रीसाठी वापरले जाणारे बिल बुकही जप्त केले. या बिलांमध्ये रुग्णाचे नाव, औषधाचे नाव आणि रक्कम याशिवाय इतर महत्त्वाचे तपशील नमूद करण्यात आले नव्हते. औषधांचा बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक, मुदत समाप्ती दिनांक तसेच उत्पादकाची माहिती अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले.

    अधिकाऱ्यांच्या मते, ही बाब ग्राहक संरक्षण आणि औषध विक्रीसंदर्भातील कायदेशीर नियमांचे उल्लंघन करणारी आहे. तसेच औषधविक्रीसाठी आवश्यक तांत्रिक किंवा वैधानिक पात्रता नसलेल्या व्यक्तीकडून हे काम करून घेतले जात असल्याचेही स्पष्ट झाले.

    FDA Action In Govandi, Mumbai

    ९ लाखांहून अधिक किमतीचा साठा जप्त

    या कारवाईत एकूण ९ लाख ९ हजार २१५ रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने पुढील तपास सुरू केला असून संबंधितांविरोधात औषधे व प्रसाधने अधिनियम १९४० आणि त्याअंतर्गत नियमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

    आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा

    रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. परवान्याविना औषधविक्री, अपात्र व्यक्तींमार्फत औषध वितरण किंवा कायदेशीर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांनी दिला आहे. नागरिकांनी औषधे केवळ परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत आणि प्रत्येक खरेदीवेळी वैधानिक तपशील असलेले बिल घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा