• Sat. Jun 13th, 2026

    मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण रस्ते निर्माण करावेत – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 12, 2026
    मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण रस्ते निर्माण करावेत – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

    पुणे, दि. १२: शेत रस्ते हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांचा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये समावेश करण्यात यावा, असे निर्देश राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. जिल्ह्यात अधिकाधिक रस्ते निर्माण करण्यात यावेत, याकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

    मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक विधानभवन येथील झुंबर सभागृह येथे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, यावेळी आमदार शंकर मांडेकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशिला देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जिल्हास्तरीय कार्यकारी समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

    श्रीमती पवार म्हणाल्या, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणारी योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दर्जेदार रस्ते मिळणार आहेत. रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यासह त्यांच्यामध्ये समाधानाची भावना निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण व दर्जेदार रस्ते निर्माण करण्याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन श्रीमती पवार यांनी केले. योजनेच्या प्रगतीचा आढावा दरमहा बैठक आयोजित घेण्यात येईल, जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या पुढील बैठकीस जिल्ह्यातील आमदारांना निमंत्रित करावे, असेही श्रीमती पवार म्हणाल्या.

    यावेळी श्री. जगदाळे यांनी या योजनेअंतर्गत विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांचा समावेश करण्याबाबत सूचना केली. जिल्ह्यात रस्ते निर्मितीच्या कार्यात सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. जगदाळे म्हणाले. जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाबाबत संगणकीय सादरीकरण केले. जिल्हास्तरीय कार्यकारी समितीने निश्चित केलेले कंत्राटदारांची सूची (पॅनल), कमी दराची निविदा (एल १) दर, मोजणी करुन निश्चित केलेले ५०५ रस्ते आदीबाबत माहिती दिली तसेच मोजणी झालेल्या रस्त्यांचे आठवड्याभरात काम सुरु करणार असल्याचे श्री. डुडी यांनी सांगितले.
    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed