• Wed. Jun 10th, 2026

    वैश्विक ओळखपत्र अर्ज क्रमांक अद्ययावत करण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 9, 2026
    वैश्विक ओळखपत्र अर्ज क्रमांक अद्ययावत करण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ – महासंवाद

    मुंबई, दि.९ : दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि अद्याप वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी) प्राप्त न केलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाडीबीटी पोर्टलच्या तांत्रिक अद्ययावतीकरणामुळे लाभार्थ्यांना त्यांचा अर्ज क्रमांक एसएएस पोर्टलवर अद्ययावत करण्यासाठी आता १५ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

    दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या १५ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, यूडीआयडी ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांनी १५ जून २०२६ पर्यंत स्वावलंबन पोर्टलवर अर्ज करून त्यांचा अर्ज क्रमांक एसएएस पोर्टलवर अद्ययावत करणे आवश्यक होते. या प्रक्रियेच्या अंमलबजावणीची जबाबदारी नायब तहसीलदार (विशेष सहाय्य योजना) यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र, माहिती व तंत्रज्ञान महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, विद्यमान महाडीबीटी पोर्टलचे ‘महाडीबीटी २.०’ या नव्या व अधिक प्रगत प्रणालीमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. या प्रणाली स्थलांतराच्या तांत्रिक प्रक्रियेमुळे १ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवरील विविध सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत.

    या कालावधीत लाभार्थ्यांना आवश्यक कामे करता येणार नसल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी अर्ज क्रमांक अद्ययावत करण्याची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता लाभार्थ्यांना १५ जुलै २०२६ पर्यंत एसएएस पोर्टलवर अर्ज क्रमांक अपडेट करता येणार आहे.

    दिव्यांग सक्षमीकरण विभागाने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुधारित मुदतीची नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

     

    0000

    शैलजा पाटील/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed