• Tue. Jun 9th, 2026

    कोल्हापूर आणि पुण्यात २४.८१ लाख रुपयांचा औषधसाठा जप्त; एफडीएची कारवाई – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 9, 2026
    कोल्हापूर आणि पुण्यात २४.८१ लाख रुपयांचा औषधसाठा जप्त; एफडीएची कारवाई – महासंवाद

    मुंबई, दि. ९ जून : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात ८ जून २०२६ रोजी दोन कारवाया करत एकूण 24 लाख 81 हजार रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

    कोल्हापूरमध्ये औषधसाठा जप्त

    कोल्हापूर येथील रविवार पेठ परिसरातील मे. मेडटॅब्स फार्मा प्रा. लि. येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात अॅलोपॅथिक औषधे, विशेषतः प्रतिजैविक (अँटिबायोटिक) इंजेक्शन्सचा साठा आढळून आला. सदर औषधांच्या खरेदी-विक्रीसाठी आवश्यक परवाने व वैध कागदपत्रे नसल्याने औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० मधील तरतुदींचे उल्लंघन प्रकरणी औषधांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून उर्वरित २९ प्रकारच्या औषधांचा ₹13.62 लाख किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

    पुण्यात औषध कंपनीच्या गोदामावर कारवाई

    दुसऱ्या कारवाईत पुणे जिल्ह्यातील वडकी येथे असलेल्या मे. सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड यांच्या गोदामाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ‘रेक्टीन प्लस टॅब्लेट’ या शेडयूल एच अंतर्गत येणाऱ्या प्रिस्क्रिप्शन औषधाच्या पॅकेजिंगवर औषधाच्या वापराबाबत जाहिरात करण्यात आल्याचे आढळून आले. अशा प्रकारची जाहिरात औषधे व सौंदर्यप्रसाधने नियम, १९४५ मधील तरतुदींशी विसंगत असल्याने संबंधित औषधाचा सुमारे ₹11.19 लाख किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. औषध उत्पादक व विक्रेत्यांनी सर्व कायदे व नियमांचे काटेकोर पालन करावे. राज्यात औषध उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्री क्षेत्रातील कोणतीही बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा कंपन्यांविरुद्ध कठोर व सातत्यपूर्ण कायदेशीर कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

    औषधे केवळ अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत. संशयास्पद औषध विक्री, बेकायदेशीर साठा किंवा अनियमिततेची माहिती प्रशासनाला तात्काळ द्यावी असे आवाहन केले आहे.

    0000

    किरण वाघ‍/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed