• Tue. Jun 9th, 2026
    माझ्या भावाचा काय दोष? कुटुंब सावरणाऱ्या 25 वर्षीय नियाजचा बेस्ट बस अपघातात अंत, भावंडांचा बांध फुटला

    Mumbai BEST Bus Accident Niyaz Ali Death : मुंबईतील प्लाझा येथे अनियंत्रित बेस्ट बसच्या धडकेमध्ये नाहक जीव गमवावा लागलेला नियाज अहमद अली हा उत्तर प्रदेशच्या बहराइच या गावातील रहिवासी होता. महिनाभरापूर्वी त्याने ‘स्विगी’मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम सुरू केले होते

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘माझ्या भावाचा काय दोष? तो पोटापाण्यासाठी, कुटुंबाला आधार देण्यासाठी मुंबईत आला. दीडच महिन्यापूर्वी त्याने हे नवीन काम सुरू केले होते. त्याच्या आई-वडिलांना आता काय सांगायचे? अशी विचारणा करताना बेस्ट अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नियाज अहमद (२५) याच्या चुलत भावाच्या अश्रूंचा बांध फुटला. या अपघातात आमचा दोष काय ? वारंवार होणाऱ्या अपघातांतून बेस्ट धडा घेणार का? असे प्रश्न नियाजच्या कुटुंबीयांसाह जखमींच्या नातेवाइकांकडून विचारले जात आहेत.

    कुटुंबाला आधार देणारा लेक

    अनियंत्रित बेस्ट बसच्या धडकेमध्ये नियाजला नाहक जीव गमवावा लागला. तो उत्तर प्रदेशच्या बहराइच या गावातील रहिवासी होता. महिनाभरापूर्वी त्याने ‘स्विगी’मध्ये डिलिव्हरी बॉयचे काम सुरू केले होते. डिलिव्हरी केल्या जाणाऱ्या पार्सलनुसार त्याला पैसे मिळायचे. नियाज वरळी येथे भाड्याच्या घरात त्याच्या मित्रासोबत राहत होता. पाचेक वर्षांपासून त्याने मुंबईमध्ये विविध प्रकारची कामे केली.

    गावी मुलगी पाहायला जाणार होता

    सुरुवातीला तो कांदे-बटाटे पोहोचवण्याचे काम करायचा. अधिक पैसे मिळावेत यासाठी त्याने स्विगी-इन्स्टामार्टमध्ये डिलव्हरी बॉयचे काम स्वीकारले. त्याच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे ते काम करू शकत नाहीत. या महिन्यात नियाज लग्नासाठी गावी मुलगी पाहायला जाणार होता. बहिणीच्या शिक्षणाची, लग्नाची जबाबदारीही त्याच्यावर होती. या भीषण अपघाताने त्याच्या कुटुंबाचा आधार हिरावून घेतला. प्रशासनाने आर्थिक मदत करून कुटुंबाला आधार द्यावा अशी, अशी मागणी नियाजचे काका रोज अली यांनी केली.

    Bachhu Kadu | आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

    २१ वर्षांच्या ऋषभची मृत्यूशी झुंज

    या अपघातात २१ वर्षीय ऋषभ गुप्ता हादेखील गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला इजा झाली असून, तो मृत्यूशी झुंज देत आहे. ऋषभवर महापालिकेच्या शीव येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महापौर रितू तावडे, बेस्ट समितीच्या अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी रुग्णालयात भेट देऊन ऋषभच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, त्याची आई रामा गुप्ता, इतर नातेवाइकांही भेट घेऊन धीर दिला.
    Maharashtra TimesKerala Accident : पती-पत्नीचा अपघातात अंत, ऐनवेळी कार बदलल्याने चिमुरडी बचावली; शोकाकुल बॉस दुबईहून निघाला, कुटुंबाने अंत्यविधी थांबवून ठेवले
    ऋषभच्या उपचाराचा सर्व खर्च प्रशासनाच्या वतीने केला जाईल. त्याच्या उपचारात सर्वतोपरी दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. तसेच, संबंधित बेस्ट बस कंत्राटदाराला तेथूनच थेट दूरध्वनी करून गुप्ता कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची तत्काळ मदत करण्याची सूचना महापौर आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षांनी केल्याचे ऋषभच्या नातेवाइकांनी सांगितले.

    अपघातात तिकीट निरीक्षक सतीश वाघमारे यांना छाती व कमरेला दुखापत झाली आहे. बसचे वाहक राजेंद्र पेलेकर यांचा हात फ्रॅक्चर झाला असून, चालक विकास पदारेंच्या पायाला दुखापत झाली आहे. तसेच, बेस्ट निरीक्षक महेश डोईफोडे (५०) आणि पादचारी अमित म्हात्रे (४१) यांनाही यात दुखापत झाली आहे.

    Dadar Plaza BEST Bus Accident Niyaz Ali  Maharashtra Times (1)

    महिला पोलीस कॉन्स्टेबलला वाचवलं

    दरम्यान, ‘बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर चालकाने शिवाजी पार्कच्या दिशेने न जाता बस उजव्या बाजूला वळवली. यामुळे कोतवाल गार्डनजवळील गाड्यांना धडक बसली. मात्र, वळणामुळे वेग कमी होऊन मोठा अनर्थ टळला. यातचही त्याने एका महिला पोलिस कॉन्स्टेबलला वाचवण्याचा प्रयत्न केला’, असे मदतकार्यासाठी पोहोचलेल्यांपैकी एक असलेल्या अमित चव्हाण यांनी सांगितले.

    नेमके काय झाले हे कळलेच नाही. प्लाझा येथे बसमध्ये चढलो. काही कळायच्या आत जोरात आपटलो. पाठ आणि हाताला जोरात धक्का बसला आणि मार लागला. चालकाचे बसवरचे नियंत्रण अचानक सुटल्याने हा प्रसंग ओढावला, असे तिकीट निरीक्षक सतीश वाघमारे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितले.
    Maharashtra TimesDU Professor Murder : खुनासाठी 1400 किमी प्रवास, संशय टाळण्यासाठी 13 वर्षांच्या मुलाची ढाल, दिल्लीच्या प्राध्यापिकेला संपवणाऱ्या जोडप्याचा पर्दाफाश

    आम्ही काय उत्तर देणार?

    अपघातानंतर बसचे वाहक व तिकीट तपासनीस उपचारानंतर रुग्णालयातून बाहेर येताच त्यांना जखमींचे नातेवाईक व प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावर, ‘आम्हाला काहीही विचारू नका, आमच्याकडे उत्तर नाही’, हे सांगताना त्यांच्या स्वरातला त्रागा लपत नव्हता. ‘या सर्वांना उत्तरे देण्यासाठी कुणाला तरी जबाबदार व्यक्तीला इथे पाठवा. आम्हाला जाऊ द्या’, असे तिथे त्यांची विचारपूस करण्यासाठी आलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना सांगून त्यांनी काढता पाय घेतला.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा