• Sun. Jun 14th, 2026

    उन्मळून पडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणासह नवीन वृक्षारोपण उपक्रम राबवा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 7, 2026
    उन्मळून पडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणासह नवीन वृक्षारोपण उपक्रम राबवा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार – महासंवाद

    बारामती, दि.७: बारामती शहर आणि परिसरात शुक्रवारच्या वादळी पावसामुळे शहरातील उन्मळून पडलेल्या झाडांचे मुळासकट पुनर्रोपण करावे, पावसाळ्यापूर्वी नव्याने अधिकाधिक वृक्षारोपण करावे,  असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. तत्पूर्वी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती सायकल क्लब आणि बारामती हेल्थ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिरंगा सर्कल ते पुनावाला गार्डन रेल्वे स्टेशन मार्ग दरम्यान सायकल रॅलीला उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

    उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी शहरातील वादळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, बारामती ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, गट विकास अधिकारी किशोर माने, न.प. मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी  तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक संभाजी होळकर, स्थानिक लोकप्रतिनिधी,  एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती सायकल क्लब आणि बारामती हेल्थ क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

    उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, बारामती शहर आणि परिसरात शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते, यावेळी नागरिकांच्या पुढाकाराने तसेच सर्व यंत्रणांनी अहोरात्र काम करुन जनजीवन पूर्ववत केले. या कालावधीत शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली, त्यांचे पुनर्रोपण करावे. येत्या पावसाळ्यात अधिक वेगाने वाऱ्याचे वहन झाल्यास झाडे वाचली पाहिजेत, याकरिता उपाययोजना कराव्यात.

    निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्याने विकासकामांना गती द्यावी, प्रलंबित प्रकल्प गतीने पूर्ण करावे, दिवंगत अजित पवार यांच्या स्वप्नातील बारामती तालुका विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या पाहणीदरम्यान त्यांनी केले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed