• Fri. Jun 5th, 2026
    Maharashtra Decentralises Govt Land Powers: शासकीय जमिनींच्या व्यवहारांचे नियम बदलले; जिल्हाधिकाऱ्यांना निर्णयाचे अधिकार, महसूल विभागाचा मोठा निर्णय

    Maharashtra Decentralises Govt Land Powers: शासकीय जमिनींची विक्री, हस्तांतरण, पुनर्विकास आणि वापराबदल प्रस्तावांसाठी मंत्रालयाची मंजुरी आवश्यक राहणार नाही. फडणवीस सरकारने अधिकार जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे सोपवत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : शासकीय जमिनींसंदर्भातील प्रस्तावांच्या मंजुरीसाठी मंत्रालयाच्या फेऱ्या माराव्या लागणाऱ्या नागरिकांना आणि विकासकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण की, आता सरकारने तसा मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत शासकीय जमिनींची विक्री, हस्तांतरण, पुनर्विकास तसेच वापरातील बदल यासंबंधीचे अनेक अधिकार जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे सोपवले आहेत. त्यामुळे स्थानिक स्तरावरच प्रस्तावांवर निर्णय होऊन प्रक्रिया अधिक वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

    मंत्रालयावरील ताण कमी होणार

    महसूल विभागाने या निर्णयासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत करण्यात आलेल्या या बदलामुळे अनेक प्रस्तावांसाठी मंत्रालयाची मंजुरी घेण्याची आवश्यकता कमी होणार आहे. त्यामुळे पर्यायाने मंत्रालयावरील ताण कमी होणार आहे.

    आतापर्यंत शासकीय जमिनींची विक्री, हस्तांतरण, पुनर्विकास, अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक किंवा विकास हक्क हस्तांतरणाशी संबंधित प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मंत्रालयाकडे पाठवावे लागत होते. त्यामुळे प्रक्रिया दीर्घकाळ रखडत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या.

    Maharashtra TimesMaratha Reservation: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मराठा समाजाला ओबीसींसारख्याच 8 योजनांचा लाभ, हाकेंचा तीव्र आक्षेप

    कोणाला किती अधिकार?

    नव्या निर्णयानुसार दहा लाख रुपयांपर्यंतच्या प्रकरणांमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. तर वीस लाख रुपयांपर्यंतच्या प्रस्तावांवर विभागीय आयुक्त स्तरावर मंजुरी दिली जाऊ शकते.

    तसेच यापूर्वी जारी करण्यात आलेल्या २८ डिसेंबर २०१५ आणि १७ सप्टेंबर २०१६ च्या अधिसूचना रद्द करण्यात आल्या आहेत. नजराणा आणि अन्य शुल्कांची वसुली मात्र नियमानुसारच केली जाणार आहे. एखाद्या प्रकरणात विसंगती आढळल्यास मूळ अटी आणि नियम लागू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

    विकासकामांना गती मिळण्याचा दावा

    या निर्णयामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि प्रवासाचा खर्च वाचणार असल्याचा दावा शासनाकडून करण्यात आला आहे. स्थानिक पातळीवरच प्रस्ताव निकाली निघाल्याने विविध विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा