• Sat. Jun 6th, 2026

    पालखी सोहळा सुखकर आणि सुरक्षित पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – विभागीय आयुक्त शितल तेली-उगले – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 4, 2026
    पालखी सोहळा सुखकर आणि सुरक्षित पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – विभागीय आयुक्त शितल तेली-उगले – महासंवाद

    सातारा दि. ४, २०२६ – पालखी सोहळा सुखकर आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध व समन्वयाने काम करावे. तसेच पालखी मार्गावरील व पालखीचा मुक्काम असणाऱ्या तळांची आवश्यक कामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी केल्या.

    संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी आज लोणंद ते फलटण दरम्यानच्या पालखी मार्गाची व तळांची भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम, वाई उपविभागाचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे, फलटण उपविभागाच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, प्रभारी खंडाळा तहसीलदार रविराज जाधव, फलटण तहसीलदार अभिजीत जाधव, फलटण नगरपालिका मुख्याधिकारी निखिल जाधव, आळंदी देवाची येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजननाथ, राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम पाटील, चैतन्य लोंढे उर्फ कबीरबुवा  यांच्यासह सर्व कार्यान्वयीन यंत्रणाचे प्रमुख उपस्थित होते.

    यावेळी विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी श्री संत ज्ञानेश्वर पादुका निरास्नान स्थळाची, चांदोबाचे लिंब, तरडगाव पालखीतळ, राव रामोशी पूल, फलटण पालखी मार्ग, व बरड पालखी तळ येथे भेट देऊन पाहणी केली.

    वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आवश्यक त्या सोयी सुविधा देऊन प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी करण्याच्या सूचना दिल्या. लोणंद, तरडगाव ते फलटण, बरड या मुख्य पालखी मार्गावरील रस्त्याची अपुरी कामे तात्काळ मार्गी लावावीत. पालखी मार्गावर आणि विसाव्याच्या ठिकाणी असलेली तात्पुरती बांधकामे व अतिक्रमणे स्थानिक प्रशासनाने हटवावीत.  लोणंद व फलटण येथील पालखी तळाची स्वछता, सपाटीकरण, चिखल होऊ नये म्हणून मुरूम टाकणे आणि पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी. वारी काळात वारकऱ्यांना मूलभूत  व आरोग्य सुविधा मिळण्यावर भर देण्यात यावा. पालखीच्या संपूर्ण मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तात्पुरती व फिरती शौचालये उपलब्ध करून स्वच्छतेसाठी २४ तास पथके तैनात ठेवण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.

    वारकऱ्यांना टँकर्सद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नगरपालिका, जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध करून देण्यात यावा. पाण्याच्या उपलब्ध स्रोतांची माहिती घेऊन येथील पाणी पिण्यालायक असल्याची खात्री करावी. आरोग्य विभागाने फिरते दवाखाने, पुरेशा रुग्णवाहिका आणि औषधसाठा सज्ज ठेवावा. विद्युत आणि सुरक्षा व्यवस्था पालखी मुक्कामाच्या ठिकाणी चोवीस तास वीज राहील याची दक्षता महावितरणने घ्यावी. पालखी सोहळ्या दरम्यान पालखीला भेट देणाऱ्या भक्तांच्या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सातारा पोलीस दलाने काटेकोर नियोजन करावे अशा सूचनाही विभागीय आयुक्तांनी केल्या.

    रस्त्याच्या रुंदीकरणावेळी काढण्यात आलेली झाडे पालखी मार्गावर पुनर्रोपण करावीत.

    पालखी मार्गावर असणाऱ्या  फलटण शहराजवळील राव रामोशी पुलाची पाहणीही यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती तेली -उगले यांनी केली. सदर काम येत्या 30 जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावे. या कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तींविरोधात  पोलिसांच्या मदतीने कारवाई करावी असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

    यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी  करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली.

    000

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed