• Sat. Jun 13th, 2026

    नवीन वीज उपकेंद्रामुळे बळसाणे परिसर विकासाला मिळणार चालना – पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 1, 2026
    नवीन वीज उपकेंद्रामुळे बळसाणे परिसर विकासाला मिळणार चालना – पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    धुळे, दि. १ जून २०२६(जिमाका वृत्तसेवा) : वीज कंपनीच्या नवीन उपकेंद्रामुळे साक्री तालुक्यातील बळसाणे परिसरातील वीज सुविधा अधिक सक्षम होऊन विकासाला गती मिळणार असून शेती, घरगुती वापर तसेच भविष्यातील औद्योगिक गरजांसाठी मोठी मदत होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

    साक्री तालुक्यातील बळसाणे (सतमाने फाटा) येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ३३/११ के.व्ही. नवीन उपकेंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात पालकमंत्री श्री.रावल बोलत होते. यावेळी विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता सायस दराडे, कार्यकारी अभियंता भाऊसाहेब पाटील, अपर तहसीलदार अधिकार पेंढारकर, दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, बळसाणेचे सरपंच ज्ञानेश्वर हालोरे, यांच्यासह लोकप्रतिनिधी, महावितरणचे अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

    पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर नवीन उपकेंद्रामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम, सुरळीत व दर्जेदार होणार आहे. सिंचन, शेती, उद्योग, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना याचा थेट लाभ मिळेल. तसेच वीज यंत्रणेवरील ताण कमी होऊन भविष्यातील वाढती गरजही पूर्ण करता येणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी पाणी, वीज आणि शेतीमालाला योग्य भाव या बाबींवर शासनाचा भर आहे. नैसर्गिक संकटांचा सामना करत असताना शाश्वत विकासाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे काम सुरू आहे. विहिरी, बंधारे, सिंचन सुविधा आणि शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

    परिसरातील वीजपुरवठा मजबूत करण्यासाठी बळसाणे येथे ३३ के.व्ही. उपकेंद्र उभारण्यात येत असून त्यासोबत मुख्य व जोडणी लाईनची कामेही केली जाणार आहेत. या उपकेंद्रामुळे बळसाणे परिसरातील बळसाणे, कढरे, सतमाने, आगरपाडा, दुसाने, इंदवे, हट्टी, ऐचाळे, डोंगराळे तसेच अन्य 3 पाड्यांसह एकूण १२ गावांना लाभ होणार आहे. शेती, घरगुती वापर तसेच आगामी औद्योगिक विकासासाठीही हे उपकेंद्र महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    ते पुढे म्हणाले की, शिंदखेडा मतदारसंघात ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामे सुरू आहेत. शिंदखेडा शहरासाठी १३२ के.व्ही.चे मोठे सबस्टेशन उभारण्यात आले असून, शिरपूर येथे २२० के.व्ही. सबस्टेशन दहिवद परिसरातही ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. धुळे जिल्ह्यात सिंचन, शिक्षण आणि उद्योग क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी पालकमंत्री म्हणून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. धुळे जिल्हा सोलर हब म्हणून विकसित होत असताना येथील सौरऊर्जेचा लाभ सर्वप्रथम जिल्ह्यातील नागरिकांना मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

    शेतकरी बांधवांना सोलर पंपाची योजना लागू केली असून अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात आला. ‘कुसुम’ योजनेच्या माध्यमातून ठिकठिकाणी सोलरचे हब निर्माण करण्यात येवून सोलर हबच्या माध्यमातून किमान 24 तास शेतकऱ्यांना मिळावी यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. धुळे जिल्हा हा भारतात सोलर हब म्हणून विकसित झाला आहे. सोलरची वीज बॅटरीमध्ये स्टोअर करता येईल का यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा विभागामार्फत जिल्ह्यात विविध विकासकामांना गती मिळत असून अनेक ठिकाणी नवीन सबस्टेशन व वीज प्रकल्प राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. सिंचन, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातही जिल्ह्यात महत्त्वपूर्ण कामे सुरू आहेत, असेही पालकमंत्री श्री. रावल यांनी यावेळी सांगितले.

    यावेळी दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील  यांनी मनोगत व्यक्त केले तर अधीक्षक अभियंता श्री. दराडे यांनी प्रास्ताविक केले.

    00000

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed