• Fri. Jun 5th, 2026
    खर्च ऐकताच भलेभले गारठले, फडणवीसांची शिफारस आणणाऱ्या इच्छुकावर काट, पार्थ पवारांच्या निकटवर्तीयाला विधान परिषद नक्की

    Vidhan Parishad Election : पार्थ पवार शनिवारी पुण्यात दाखल झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी भोसलेनगर येथील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली होती.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असून, माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम यांच्या नावास हिरवा कंदील दर्शविल्याची ‘राष्ट्रवादी’च्या गोटात चर्चा आहे.

    माजी आमदार सुनील टिंगरे, विलास लांडे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष योगेश बहल, पुण्याचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर, नगरसेवक नाना काटे, संदीप वाघिरे आणि अमोल बालवडकर, रणजित शिवतरे यांना डावलून काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

    फडणवीसांची शिफारस आणत साकडं

    खासदार पार्थ पवार शनिवारी पुण्यात दाखल झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी भोसलेनगर येथील पवार यांच्या निवासस्थानी धाव घेतली होती. जवळपास सतरा ते अठरा इच्छुकांनी पवार यांच्याशी चर्चा करून तेच कसे ‘सक्षम’ उमेदवार आहेत, याची माहिती दिली होती. यातील एका इच्छुकाने, तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच शिफारस आणत पवार यांना साकडे घातले होते. उमेदवारी ‘राष्ट्रवादी’ची आणि शिफारस मुख्यमंत्र्यांची आल्यामुळे संबंधिताकडे पवार यांनी नाराजीही व्यक्त केल्याचे उपस्थितांनी सांगितले.
    Maharashtra TimesVidhan Parishad : सुप्रिया सुळेंच्या व्याह्यांना भाजपचं तिकीट, अरुण लखानींना विधानपरिषदेची उमेदवारी, जागावाटपाचा तिढा सुटला

    उमेदवारीचा निर्णय प्रलंबित

    या दरम्यान, पवार यांनी सर्व उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाची या निवडणुकीतील भूमिका आणि रणनिती कशी राहील, याचा आढावा घेतला. मित्रपक्षांकडून दगाफटका तर होणार नाही ना, याची खातरजमा इच्छुकांकडून करण्यात आली. त्यानंतर सर्व इच्छुक मध्यरा‍त्री आपापल्या घरी परतले. पवार यांनी उमेदवारीचा निर्णय सकाळी घेण्यात येईल, असे सांगितल्यामुळे इच्छुकांनी रविवार सकाळपासूनच उमेदवारीसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली.

    धनंजय देशमुखांवरील आरोप खोटे, FIR ची माहिती फडणवीसांना देणार

    दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रविवारी पुण्यात दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा पवार यांचे निवासस्थान इच्छुकांमुळे गजबजले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी सकाळी पुण्यातच असल्यामुळे पार्थ पवार आणि त्यांची भेट होईल, अशी चर्चा होती. मात्र, दोघांमध्ये भेट न झाल्यामुळे उमेदवारीचा निर्णय हा प्रलंबित राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
    Maharashtra TimesGeorgia Crash : लग्नानंतर नवदाम्पत्य निघालं, पायलटचा अट्टाहास जीवावार, हेलिकॉप्टर कोसळून नवरदेवाचा अंत, वधूच्या समोरच प्राण सोडले

    खर्चाचे आकडे ऐकताच उमेदवारांचे पाय लटपटले

    ‘राष्ट्रवादी’च्या गोटातून इच्छूक उमेदवारांची ‘कुंडली’ तपासण्याबरोबरच त्यांच्या ‘आर्थिक’ शक्तीची चाचपणी रविवारी पुन्हा घेण्यात आली. या उमेदवारांचे ‘ग्रह’ भाजपशी जुळणारे आहेत की नाही, याचा अंदाज बांधण्यात आला. ग्रह जुळले तरी निवडणूक लढविण्यासाठी त्यांची आर्थिक शक्ती कितपत आहे, याचा स्पष्ट अंदाज घेण्यात आला. संभाव्य खर्चाचे आकडे ऐकल्यानंतर काही उमेदवारांचे पाय लटपटल्याचीही चर्चा होती. त्यानंतर पवार यांनी रविवारी मध्यरात्री काही इच्छुकांशी चर्चा केली. काकडे यांच्या नावाला हिरवा कंदिल दर्शविल्याची चर्चा असून, उशिरापर्यंत अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर इच्छुकांची समजूत काढण्यास सुरुवात केल्याचे समजते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा