• Fri. Jun 5th, 2026
    सुप्रिया सुळेंच्या व्याह्यांना भाजपचं तिकीट, अरुण लखानींना विधानपरिषदेची उमेदवारी, जागावाटपाचा तिढा सुटला

    Arun Lakhani : सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण लखानी यांना वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटपाचा तिढा अखेर रविवारी सुटला. महायुतीत भाजपला ११, शिवसेनेला ४ आणि राष्ट्रवादीसाठी दोन जागा सोडण्याचे निश्चित झाले. महाविकास आघाडीने दोन दिवसांपूर्वीच आपले जागावाटप जाहीर केले आहे. त्यानुसार काँग्रेस ८, शिवसेना उबाठा ४ तर राष्ट्रवादी शप ३ जागा लढविणार आहे. नाशिक आणि नांदेड या २ जागांवरील तिढा कायम आहे. आज, सोमवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस आहे.

    राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अधिकाधिक जागा लढविण्याचा भाजपचा आग्रह होता. तर, मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने ७ जागांची मागणी लावून धरली होती. त्यासाठी शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा केली. मात्र, शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले. यात ठाणे, नाशिक, परभणी-हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघांचा समावेश आहे. शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यासाठी कोकणच्या जागेवरील दावा सोडावा लागला. मात्र, बदल्यात रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेला मिळणार असल्याचे समजते.

    राष्ट्रवादीला पुणे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन जागा मिळाल्या आहेत. यातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली जाणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

    जरांगेंची सेटलमेंट, मराठा समाजाची फसवणूक, आम्ही शांत बसणार नाही! वाघमारे ललकारले

    भाजपच्या यादीत सुळे यांचे व्याही

    भाजपने रविवारी रात्री उशिरा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यात सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण लखानी यांना वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून उमेदवारी देण्यात आली आहे. सुप्रिया यांच्या कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार असून सारंग अरुण लखानी यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहेत. त्या नागपूरच्या सूनबाई होणार आहेत. अरुण लखानी नागपुरातील विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जात असून या दोघांच्या मध्यस्थीनेच रेवती-सारंगचे लग्न जुळल्याची माहिती आहे.
    Maharashtra TimesSuman Kalyanpur Death : प्रिय मैत्रिणीच्या निधनाने अतीव दुःख, सुमन कल्याणपूर यांचा अलविदा, उषा मंगेशकर यांना शोक अनावर

    तनपुरेंनाही संधी

    याशिवाय भाजपमध्ये दाखल झालेल्या प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगर येथून उमेदवारी जाहीर केली आहे. नागपूर पोटनिवडणुकीसाठी डॉ. राजीव पोतदार यांना संधी मिळाली आहे. सांगली-सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, अमरावतीतून प्रवीण पोटे पाटील, सोलापुरातून राजेंद्र राऊत, तर नांदेडमधून अमर राजूरकर यांना संधी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, धाराशिव-लातूर-बीडमधून बसवराज पाटील, जळगावातून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

    Supriya Sule Revati Sule  Maharashtra Times

    ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून परभणी-हिंगोली मतदारसंघातून डॉ. विवेक नावंदर तर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून सुरेंद्र उर्फ बाळ माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

    तटकरे शिंदे यांच्या भेटीला

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी शनिवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत विधान परिषदेच्या रायगडच्या जागेसंदर्भात एकमत झाल्याचे कळते. यासंदर्भात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रथम वृत्त दिले होते. तटकरे आज, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
    Maharashtra TimesVidhan Parishad : पुण्यात पुन्हा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी! पवारांनी सूचना देताच कार्यकर्ते कामाला, महायुतीला ‘महागात’ पडणार?

    शिवसेनेकडे सर्वाधिक मते

    कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेत मोठा पक्ष शिवसेना आहे. सेनेकडे सुमारे ३०५ मते आहेत. भाजपकडे २७६, राष्ट्रवादीकडे ११५, शिवसेना उबाठाची ५० ते ५५ मते आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा