• Sat. Jun 6th, 2026

    Manoj Jarange Patil: रखरखत्या उन्हात जरांगे पाटील उपोषणाला बसले, विखे भेटले; सरकारकडून आश्वासने, जालन्यात दिवसभरात काय-काय घडलं?

    Manoj Jarange Patil: रखरखत्या उन्हात जरांगे पाटील उपोषणाला बसले, विखे भेटले; सरकारकडून आश्वासने, जालन्यात दिवसभरात काय-काय घडलं?

    जालना: मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे रखरखत्या उन्हात आमरण उपोषणाला सुरुवात केली. सध्या जालन्यात तब्बल 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत असताना जरांगे पाटील यांनी शेतातील खुल्या मैदानात बाज टाकून हे उपोषण सुरू केल्याने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरातून हजारो मराठा समाजबांधव अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत.

    सकाळी 10 वाजता उपोषणाला सुरुवात करताना मनोज जरांगे पाटील यांनी ‘जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मी या तापत्या उन्हात आमरण उपोषण सुरू ठेवणार आहे,’ असा इशारा राज्य सरकारला दिला. यापूर्वीच्या उपोषणांपेक्षा हे आंदोलन वेगळे असून खुले मैदान, प्रखर ऊन आणि कोणत्याही विशेष सुविधांशिवाय उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

    दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी येथे भेट देत मनोज जरांगे पाटील यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केली. या चर्चेदरम्यान जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या 12 प्रमुख मागण्या सरकारसमोर मांडल्या.

    सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीसंदर्भातील मागणीवर चर्चा झाली. हैदराबाद गॅजेटप्रमाणे सातारा गॅजेटची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. तसेच सरकारला या संदर्भात काही कालावधी द्यावा, अशी विनंती त्यांनी जरांगे पाटील यांच्याकडे केली. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारवर अनेक मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली. राज्यात 58 लाखांहून अधिक नोंदी सापडल्याचा सरकारचा दावा असला तरी संबंधितांना प्रमाणपत्रे दिली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दिलेल्या प्रमाणपत्रांची जात पडताळणी वेळेत होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. विशेषतः मराठवाड्यातील काही शासकीय अधिकारी मराठा समाजाला अपेक्षित सहकार्य करत नसल्याची तक्रार त्यांनी यावेळी मांडली. “माझ्या सर्व मागण्या तात्काळ पूर्ण करा. त्या पूर्ण होईपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही. प्रसंगी माझा जीव गेला तरी मी माघार घेणार नाही,” अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी हजारो समाज बांधवांसमोर व्यक्त केली.

    चर्चेनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले. सरकारसोबत पुढील चर्चा करून सायंकाळी पुन्हा अंतरवाली सराटी येथे येण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

    डॉक्टरांनी मनोज जरांगे यांना आरोग्याच्या कारणास्तव उपोषण न करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीची स्थिती पूर्वीसारखी नसल्याने उपोषणाचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो, अशी वैद्यकीय तज्ज्ञांची चिंता आहे. मात्र, तरीही जरांगे पाटील यांनी अन्न-पाण्याचा त्याग करून थेट आमरण उपोषण सुरू केल्याने राज्यभरातील नागरिकांचे लक्ष आता अंतरवाली सराटीकडे लागले आहे. दुसरीकडे, आज दिवसभरात जालन्यात विविध ठिकाणी मराठा समाज बांधवांनी आक्रमक होत रास्ता रोको आंदोलन सुद्धा केली आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गावर सकाळी दहा वाजता आंदोलन करण्यात आले आहे, तर जालना सोलापूर वडीगोद्री फाट्यावर दुपारी 4 वाजेच्या सुमारास रस्ता रोको आंदोलन करण्यात आल आहे. एकीकडे जरांगे पाटील हे अंतरवाली आमरण उपोषण करत आहे, तर त्यांच्या समर्थनार्थ राज्यातील मराठा समाज बांधव हा रस्त्यावर उतरल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे.

    दरम्यान, सरकार या आंदोलनाची कितपत गंभीर दखल घेते आणि पुढील काळात यावर कोणता तोडगा निघतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed