Prajakt tanpure joins bjp: भाजपात प्रवेशानंतर प्राजक्त तनपुरे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. भाजपाने मला संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. पक्ष भविष्यात जी जबाबदारी देईल, ती पूर्ण क्षमतेने पार पाडेन, असे तनपुरे यांनी सांगितले.
पक्षप्रवेशानंतर तनपुरे तात्काळ पक्षाच्या कामाला लागले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्राजक्त तनपुरे यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील यांचीदेखील उपस्थिती होती.
विकासकामांची अपेक्षा
पक्षप्रवेशानंतर बोलताना तनपुरे म्हणाले, “आज राहुरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे आमच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे.”
ते पुढे म्हणाले, “माझा मतदारसंघ प्रामुख्याने ग्रामीण भागाचा आहे. तिथे शेती, वीज आणि पाण्याचे अनेक प्रश्न आहेत. सरकारच्या माध्यमातून या प्रश्नांच्या सोडवणुकीला अधिक चालना मिळेल, अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.”
Jayant Patil: प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश धक्कादायक; भाच्याने पवारांची साथ सोडल्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, पक्षांतरामागील कारणावरही भाष्य!
भाजप देईल ती जबाबदारी पार पाडणार
पक्षाकडू भविष्यात जी जबाबदारी दिली जाईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा विश्वासही तनपुरे यांनी व्यक्त केला. “भारतीय जनता पक्षाने आमचे स्वागत केले आहे. यापुढे पक्ष जी भूमिका आणि जबाबदारी देईल, ती आम्ही पूर्ण क्षमतेने पार पाडू,” असे ते म्हणाले.
विलिनीकरणाच्या चर्चांबाबतही खुलासा
पक्षप्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी इतरही मुद्द्यांवर भाष्य केलं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत झालेल्या बैठकीत आपण उपस्थित होतो, याची कबुलीही त्यांनी दिली. “मी एका बैठकीला उपस्थित होतो. त्या बैठकीत काही राजकीय चर्चाही झाल्या. त्या वेळी अजित पवार उपस्थित होते,” असे त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा
पक्षप्रवेशापूर्वी आपण सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याचे तनपुरे यांनी सांगितले. “माझ्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यांच्या सदिच्छा कायम माझ्यासोबत राहतील,” असे ते म्हणाले. तसेच रोहित पवार यांच्याशीही फोनवरून चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
Tukaram Mundhe: विषारी दारुमुळे पुण्यात मृत्यूंची मालिका; तुकाराम मुंढेंनी भेसळीची पाळेमुळे खणून काढली, भिवंडीत मोठी कारवाई!
जयंत पाटील यांच्यावर म्हणाले..
आपल्या पक्षप्रवेशाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेचा कोणताही संबंध नसल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. “ते माझे मामा असले तरी आमच्या दोघांच्या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्या राजकीय निर्णयांशी माझ्या पक्षप्रवेशाचा काहीही संबंध नाही,” असे ते म्हणाले.
राहुरीतील राजकारणात नवी समीकरणे
प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे राहुरी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी हा मोठा धक्का मानला जात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विधानसभा राजकारणावरही या घडामोडींचा परिणाम होण्याची शक्यता आहे, दरम्यान, भाजपमधील एन्ट्रीनंतर आता प्राजक्त तनपुरेंना विधानपरिषदेत संधी मिळण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे.
