• Thu. Sep 3rd, 2026

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 27, 2026
राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद

मुंबई, दि. २७ : राज्यातील विद्यार्थी, संशोधक आणि वाचनप्रेमींसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीची कामे निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारत बांधकामाची मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पाहणी केली यावेळी  उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्यात आले असून फर्निचर, अंतर्गत सजावट आणि इतर पूरक कामे सुरू आहेत. या सर्व कामांमध्ये दर्जा राखून ती वेळेत पूर्ण करावीत. आधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे ग्रंथालय राज्यातील विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी तसेच वाचन संस्कृती जोपासणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ज्ञानकेंद्र ठरणार आहे. अभ्यास, संशोधन आणि ज्ञानवृद्धीसाठी आवश्यक सुविधा या ग्रंथालयात उपलब्ध करून देण्यात येणार असून हे ग्रंथालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed