• Wed. Jul 1st, 2026

    माथाडी कामगारांच्या हिताचे रक्षण करा – मंत्री आकाश फुंडकर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 26, 2026
    माथाडी कामगारांच्या हिताचे रक्षण करा – मंत्री आकाश फुंडकर – महासंवाद

    मुंबई, दि. २६: एसटी पार्सल सेवा देणाऱ्या कंत्राटदारांनी माथाडी कायद्याला अनुसरून कामगारांना त्यांचे सर्व कायदेशीर लाभ मिळवून दिले पाहिजेत. तसेच कायद्याप्रमाणे माथाडी कामगारांच्या हिताचे पूर्ण संरक्षण केले जावे, असे स्पष्ट निर्देश कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी दिले.

    नरिमन भवन येथे कामगार ॲड.आकाश फुंडकर मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत बैठक पार पडली. बैठकीस कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड, उपसचिव स्वप्निल कापडणीस आदी उपस्थित होते. तसेच आमदार सदाभाऊ खोत यांनी दूरदृष्टी संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.

    कामगार मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले, मे. ज्युबिलन्ट फूड वर्क प्रा. लिमिटेड या औद्योगिक आस्थापनाने स्थानिक भूमिपूत्र बेरोजगारांना रोजगाराची संधी दिली पाहिजे आणि तेथील माथाडी टोळीला तत्काळ मान्यता द्यावी. नवीन माथाडी कामगारांची नोंदणी करण्यासह पडताळणी करावी. या नवीन नोंदणीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांनाच पहिले प्राधान्य देण्यात यावे.

    माथाडी कामगार आणि कंपन्यांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी संबंधित सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आपल्या स्तरावर औद्योगिक आस्थापना आणि माथाडी कामगार यांची संयुक्त बैठक आयोजित करावी. या बैठकीत माथाडी कामगारांच्या प्रश्नांचे निरसन करावे, असेही कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी सांगितले.

    ००००

    निलेश तायडे/विसंअ

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed