• Wed. Jul 1st, 2026

    जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात तंबाखूमुक्ती जनजागृती कार्यक्रम – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 26, 2026
    जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात तंबाखूमुक्ती जनजागृती कार्यक्रम – महासंवाद

    मुंबई, दि. २६ : ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. कांबळे आणि समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते व्यसनमुक्तीविषयक पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. कांबळे यांनी जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे महत्व अधोरेखित करत तंबाखूच्या व्यसनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक परिणामांबाबत माहिती दिली.

    विशेषतः २० ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत असल्याचे नमूद करत डॉ. कांबळे यानी युवकांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्यासाठी जनजागृती आणि सामूहिक सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    यावेळी नशाबंदी मंडळाचे चिटणीस व मुख्य संघटक अमोल स. भा. मडामे यांनी महाराष्ट्र हे २०११ मध्ये व्यसनमुक्ती धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगितले. व्यसनमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने अधिक प्रभावी पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि धार्मिक स्थळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करण्यासाठी व्यापक जनजागृती आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

    कार्यक्रमादरम्यान ‘कल्याणयात्रा – व्यसनमुक्तीच्या गाथा’ या मासिकाच्या मे २०२६ अंकाचे प्रकाशन डॉ. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच तंबाखूमुक्ती विषयक पोस्टर्सचेही प्रकाशन करण्यात आले.

    डॉ. कांबळे आणि आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी विविध संस्थांच्या स्टॉलना भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. पोस्टर्स, प्रदर्शने, पत्रके आणि माहितीपर कटआऊटच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम तसेच ‘तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा २००३’ संदर्भातील माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.

    या कार्यक्रमात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, सलाम मुंबई फाऊंडेशन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, प्रजापिता ब्रह्मकुमारीज यांसह अनेक संस्थांनी सहभाग घेत व्यसनमुक्तीचा संदेश दिला. कार्यक्रमास नशाबंदी मंडळाच्या वतीने मुंबई शहर संघटक चेतना सावंत, ठाणे जिल्हा संघटक मिलिंद पाटील तसेच मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.

    0000

    शैलजा पाटील/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed