• Sun. Jun 14th, 2026

    Mumbai-Pune अंतर आणखी कमी होणार! 15 हजार कोटींच्या नव्या एक्स्प्रेसवेमुळे वेळही वाचणार; NHAI ने टाकलं पहिलं पाऊल

    Mumbai-Pune अंतर आणखी कमी होणार! 15 हजार कोटींच्या नव्या एक्स्प्रेसवेमुळे वेळही वाचणार; NHAI ने टाकलं पहिलं पाऊल

    Pune mumbai new expressway details: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या मुंबई-पुणे समांतर एक्स्प्रेसवेच्या डीपीआर आणि व्यवहार्यता चाचणीसाठी एनएचएआयने निविदा मागवल्या आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आता आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सध्याच्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला समांतर नवा एक्सप्रेसवे उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी प्रक्रिया सुरू केली असून, भविष्यात मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या ९० मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. या नव्या एक्सप्रेसवेसाठी तब्बल १५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाचा सविस्तर अहवाल आणि व्यवहार्यता चाचणीसाठी एनएचएआयने निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आल्याचे मानले जात आहे.

    कसा असेल नवा एक्सप्रेसवे?

    प्रस्तावित मार्ग १३० किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा पूर्णपणे नियंत्रित प्रवेश असलेला एक्सप्रेसवे असेल. रायगड जिल्ह्यातील चौक येथून या मार्गाची सुरुवात होणार आहे. पुढे तो जेएनपीटी-पागोते मार्गाला जोडला जाईल. त्यानंतर भोरजवळील शिवरे गावापर्यंत हा मार्ग जाणार असून, तिथे तो पुणे रिंग रोडशी जोडला जाईल. या नव्या मार्गामुळे पुणे ते अटल सेतू अशी थेट जोडणी निर्माण होणार आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि जेएनपीटी बंदरापर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.

    वाहतूक कोंडी कमी होणार

    सध्याच्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः विकेंड आणि सुट्ट्यांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते. घाट परिसरात वारंवार अपघातही घडतात. याच पार्श्वभूमीवर समांतर एक्सप्रेसवेचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. हा नवा एक्सप्रेसवे ८ पदरी असणार आहे. दररोज जवळपास ३ लाख वाहने या मार्गावरून धावू शकतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मालवाहतुकीलाही मोठा फायदा होणार आहे.

    Maharashtra TimesRatnagiri Crime : ‘तो तुला सोडून जाईल’; मैत्रिणीला दिलेला सल्ला महागात पडला, तरुणीच्या बॉयफ्रेंडने तरुणाला संपवलं, मृत्यूपूर्वी सुरजने महत्त्वाचा जबाब दिला

    गडकरींच्या घोषणेला गती

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर २०२५ मध्ये या समांतर एक्सप्रेसवेची घोषणा केली होती. त्यानंतर आता प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. “पागोते ते चौक या पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे-मुंबई प्रवास दीड तासांत होईल,” असे गडकरी यांनी म्हटले होते.

    इतर प्रकल्पांनाही गती

    याचसोबत पुणे-छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे प्रकल्पालाही गती दिली जात आहे. या मार्गामुळे दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या दोन तासांवर येण्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत मार्ग प्रकल्पही महत्त्वाचा मानला जात आहे. या मार्गावर रस्ता, उड्डाणपूल आणि मेट्रो अशी बहुस्तरीय वाहतूक व्यवस्था उभारली जाणार आहे. एनएचएआयचे अधिकारी संजय कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नवा एक्सप्रेसवे भविष्यातील मुंबई-बेंगळुरू महामार्गाचाही महत्त्वाचा भाग ठरणार आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा