• Sat. Jun 20th, 2026

    अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली ‘भारत फोरकास्ट सिस्टम’ चा वापर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य – मंत्री गिरीश महाजन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 21, 2026
    अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली ‘भारत फोरकास्ट सिस्टम’ चा वापर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य – मंत्री गिरीश महाजन – महासंवाद

    मुंबई, दि. २१ : अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली ‘भारत फोरकास्ट सिस्टम’ चा वापर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल. यासाठी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) समवेत करार महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन क्षमतेला अधिक बळकट करणारा महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

    महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (SDMA) भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे यांच्यासोबत सामंजस्य करार (MoU) केला असून, यामुळे राज्याच्या आपत्तीपूर्व तयारी आणि अतिवृष्टीसारख्या हवामानाशी संबंधित संकटांना प्रतिसाद देण्याच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

    या करारामुळे भारत सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ‘मिशन मौसम’ अंतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी ‘भारत फोरकास्ट सिस्टम’ (BharatFS) आता राज्याच्या निर्णयप्रक्रियेत थेट वापरली जाणार आहे. राज्य आपत्कालीन कार्य संचालन केंद्र (SEOC) आणि भू-स्थानिक निर्णय सहाय्य प्रणाली (GeoDSS) यांच्या माध्यमातून ही प्रणाली कार्यान्वित केली जाईल.

    या उपक्रमामुळे महाराष्ट्र देशातील असे पहिले राज्य ठरले आहे, ज्याने  डेटा आणि कार्यप्रवाहांचा वापर करून आपत्ती व्यवस्थापन व पूर्वसूचना प्रणाली अधिक सक्षम केली आहे. भारतFS प्रणाली 6 किमी × 6 किमी क्षेत्रासाठी अत्यंत सूक्ष्म आणि उच्च दर्जाचे हवामान अंदाज तयार करू शकते. त्यामुळे ग्रामपंचायत व उपतालुका स्तरापर्यंत अचूक हवामान माहिती उपलब्ध होणार आहे. याआधी उपलब्ध असलेल्या 12 किमी × 12 किमी अंदाजांच्या तुलनेत ही मोठी प्रगती मानली जात आहे.

    या प्रणालीमुळे उष्णतेची लाट, मुसळधार पाऊस, वादळ, पूर आणि भूस्खलन यांसारख्या आपत्तींबाबत अधिक वेगवान आणि प्रभावी पूर्वतयारी शक्य होणार आहे. हवामानासंबंधी माहिती दर तीन तासांनी अद्ययावत केली जाणार असून, पर्जन्यमान, कमाल-किमान तापमान, वातावरणीय दाब, वाऱ्याचा वेग व दिशा, तसेच ढगांचे प्रमाण याबाबत जवळपास प्रत्यक्ष वेळेत माहिती उपलब्ध होईल.

    या उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी 3 तासांच्या अंतराने उच्च-रिझोल्यूशन हवामान अंदाज, प्रभावाधारित पूर्वसूचना (IBF), स्वयंचलित अलर्ट प्रणाली, तसेच सायरन, मोबाईल संदेश आणि सार्वजनिक प्रसारणाद्वारे एकाच वेळी सूचना प्रसारित करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यातील नागरिकांपर्यंत वेळेवर इशारे पोहोचविणे अधिक प्रभावी होईल.

    आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंगल यांनी सांगितले की, “या सहकार्यामुळे राज्य व जिल्हास्तरावरील निर्णयप्रक्रिया अधिक वेगवान आणि माहितीआधारित होईल. यामुळे पूर्वसूचना प्रणाली अधिक प्रभावी बनून नागरिकांपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत माहिती पोहोचविणे सुलभ होईल.”

    राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी सांगितले की, “या सहकार्यामुळे वैज्ञानिक हवामान माहिती थेट जिल्हा प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांच्या हातात पोहोचणार असून, राज्यभरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही एक प्रभावी पायरी ठरेल.”

    नागरिकांना हवामान पूर्वसूचना, आपत्ती तयारी आणि तातडीच्या सूचनांची माहिती एसडीएमए च्या अधिकृत माध्यमांतून नियमितपणे घेण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन आपत्ती प्रतिसाद व मदतसाठी क्रमांक  एसडीएमए 1070 , डीडीएमए 1077 रुग्णवाहिका व वैद्यकीय आपत्कालीन सेवा 108 आहेत.

    0000

    किरण वाघ / वि.सं.अ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed