• Wed. Sep 23rd, 2026
Bandra East Demolition Drive : एक हजार कर्मचारी, १२ जेसीबी अन् गरीबनगरमधील ४०० झोपड्या जमीनदोस्त

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील सुमारे पाच हजार २०० चौरस मीटर जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याचे काम पश्चिम रेल्वेने १९ मेपासून सुरू केले. तब्बल नऊ वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर न्यायालयाच्या आदेशानुसार गरीब नगरमधील सुमारे ४०० झोपड्यांवर बुलडोझर चालवण्यात येत आहे. पहिल्या दिवशी २० टक्के काम पूर्ण झाले आहे. २३ मेपर्यंत अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू राहणार आहे. वांद्रे पूर्वेतील गरीब नगर, बेहरामपाडा हा संवेदनशील परिसर मानला जातो. अतिक्रमण हटवण्याच्या यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता पश्चिम रेल्वे , शहर पोलिस, रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दल यांची विशेष बैठक पार पडली. सोमवार रात्रीपासून बंदोबस्त सुरू करण्यात आला. शहर पोलिसांचे ४०० अधिकारी-कर्मचारी, रेल्वे पोलिसांसह आरपीएफचे ४०० जवान आणि पश्चिम रेल्वेचे २०० कर्मचारी अशा एकूण एक हजार कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्याच्या उपस्थितीत १२ जेसीबी, दोन पोकलेन, १२ ट्रक अशा साधनांसह तोडकाम सुरू झाले आहे. भारतीय रेल्वेतील सर्वांत मोठ्या अतिक्रमण हटाव मोहिमांत या कारवाईचा समावेश असून यामुळे सुमारे ६०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली जमीन पश्चिम रेल्वेच्या पुन्हा ताब्यात येणार आहे. या ठिकाणी वांद्रे टर्मिनसचा विस्तार करण्याचे, तसेच ‘इंटिग्रेटेड रेल्वे कॉम्प्लेक्स’ उभारण्याचे पश्चिम रेल्वेचे नियोजन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed