• Sun. Jun 7th, 2026

    विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट गाठण्यासाठी क्षमता बांधणी आराखडा महत्त्वाचा- अपर मुख्य सचिव व्ही. राधा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 20, 2026
    विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट गाठण्यासाठी क्षमता बांधणी आराखडा महत्त्वाचा- अपर मुख्य सचिव व्ही. राधा – महासंवाद

    पुणे दि. २०: विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या क्षमता विकासाचा विचार करावा लागेल. त्यासाठी क्षमता बांधणी आराखडा निर्मिती हा महत्त्वाचा टप्पा असून अधिकाऱ्यांनी कर्तव्यासोबत नव्या गोष्टी जाणून घेत आपली वैयक्तिक प्रगती साधण्याचा आनंद घेण्यासाठी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी केले.

    यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे क्षमता बांधणी आराखड्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कार्यशाळेला यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे, उपमहासंचालक सचिन कलंत्रे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव नीता शिंदे, डिजिटल लर्निंग लॅब प्रमुख कल्याणी गोखले, संचालक शाहूराज मोरे आदी उपस्थित होते.

    श्रीमती व्ही. राधा म्हणाल्या, प्रशासनाच्या शेवटच्या स्तरावरील कर्मचाऱ्याच्या क्षमता बांधणीचा विचारही आराखडा तयार करताना करायचा आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यक कौशल्य, तंत्रज्ञान आदींचा विचार करून प्रशिक्षण वेळापत्रक तयार करावे. प्रत्येक पदानुसार कर्तव्य आणि जबाबदाऱ्या निश्चित करून त्याअनुषंगाने आराखडा तयार करावा. कार्यात्मक आणि वर्तणूक संदर्भातील क्षमतांना विविध टप्प्यात आत्मसात करण्याजोगा प्रशिक्षण आराखडा तयार करावा.

    अधिकाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून क्षमता बांधणी आराखडा तयार करण्यात घेतलेला पुढाकार लक्षात घेता महाराष्ट्र हे क्षमता बांधणी कार्यक्रमात अग्रेसर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तम कार्यक्षमतेद्वारे चांगली सेवा देण्यासाठी आणि त्या माध्यमातून राज्याला विकासाच्या वाटेवर पुढे नेण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    डॉ. दिवसे यांनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले. नियमाधारित ऐवजी भूमिका आधारित प्रशासनाचा विचार करून क्षमता बांधणी आराखडा तयार करायचा आहे. विभागाच्या क्षमता, कार्य याबाबत आराखड्यामुळे संकल्पना स्पष्ट होतात. शिवाय या प्रशिक्षण आराखड्याला पदोन्नती आणि सेवा विषयक बाबींशी जोडण्यात येणार असल्याने अत्यंत सूक्ष्मरितीने आराखडा तयार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

    यावेळी श्री. कलंत्रे यांनी क्षमता बांधणी आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले आणि अधिकाऱ्यांच्या शंकाचे निरसन केले. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण केले.

    0000

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed