• Thu. Jun 18th, 2026

    सायप्रस राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी मुंबईत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सोहळा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 19, 2026
    सायप्रस राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी मुंबईत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सोहळा – महासंवाद

    मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने बुधवार, २० मे २०२६ रोजी कुलाबा येथील ताज पॅलेस येथे सायप्रस गणराज्याचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स यांच्या भारत भेटीनिमित्त विशेष ‘सांस्कृतिक स्वागत समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे. या विशेष समारंभामध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, कला आणि सांस्कृतिक वैभवाचे भव्य दर्शन घडविण्यात येणार आहे.

    हा कार्यक्रम  इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत असून, महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जागतिक स्तरावर प्रभावीपणे पोहोचविण्याचा यामागील मुख्य उद्देश आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

    या विशेष स्वागत समारंभामध्ये महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचे दर्शन घडविणाऱ्या विविध कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय पारंपरिक गणेश वंदनेने होणार असून, भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, अध्यात्म आणि मंगलतेचा संदेश या सादरीकरणातून दिला जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेली वासुदेव ही पारंपरिक लोककला सादर करण्यात येणार आहे. पारंपरिक वेशभूषा, टाळ-चिपळ्यांचा नाद आणि भक्तिमय गायनाच्या माध्यमातून वासुदेव कला महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे दर्शन घडविणार आहे.

    यासोबतच महाराष्ट्रातील पारंपरिक लोकनाट्य आणि लोकअभिनय परंपरेचा महत्त्वाचा भाग असलेली सोंगी मुखवटे ही लोककला देखील विशेष आकर्षण ठरणार आहे. विविध रंगीबेरंगी मुखवटे, पारंपरिक साज आणि नृत्य-अभिनयाच्या माध्यमातून सादर होणारी ही कला महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील सर्जनशीलता आणि कलात्मक वैभव अधोरेखित करणार आहे.

    या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि लोकपरंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांसमोर सादर होणार असून, सांस्कृतिक देवाण-घेवाणीला चालना मिळणार आहे. विदेशी पाहुण्यांसाठी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीचे प्रभावी दर्शन घडविणारा ठरणार आहे.

    सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून, विविध कलाकार आणि लोककलावंत या विशेष समारंभामध्ये सहभाग घेणार आहेत. महाराष्ट्राच्या लोककला परंपरेला जागतिक व्यासपीठ मिळवून देणारा हा सांस्कृतिक स्वागत सोहळा राज्याच्या सांस्कृतिक इतिहासात विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

    ००००

    संजय ओरके/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed