• Sat. Jun 13th, 2026

    Nilesh Lanke: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार मध्यरात्री भाजप आमदाराच्या भेटीला; विखेंच्या विरोधकांमध्ये काय शिजलं? चर्चांना उधाण

    Nilesh Lanke: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार मध्यरात्री भाजप आमदाराच्या भेटीला; विखेंच्या विरोधकांमध्ये काय शिजलं? चर्चांना उधाण

    Ahilyanagar News: या मध्यरात्रीच्या भेटीचे पडसाद आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणावर काय उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार मध्यरात्री भाजप आमदाराच्या भेटीला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मोबीन खान, कोपरगाव (अहिल्यानगर): नगर जिल्ह्याच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून नाट्यमय घडामोडी घडत असताना आता आणखी एका भेटीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार विवेक कोल्हे यांच्या कोपरगाव येथील निवासस्थानी रविवारी मध्यरात्री भेट घेतली. दोन्ही नेते सध्या वेगवेगळ्या राजकीय प्रवाहात आणि परस्परविरोधी आघाड्यांमध्ये असताना, ही भेट जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी तर नाही ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

    खासदार निलेश लंके आणि आमदार विवेक कोल्हे यांच्यातील ही भेट अत्यंत गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास लंके हे थेट कोल्हे यांच्या कोपरगाव येथील निवासस्थानी पोहोचले. दोन तरुण आणि आक्रमक नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही नेते सध्या दोन वेगवेगळ्या टोकांवर उभे असताना, ही भेट नेमकी कशासाठी होती? यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या भेटीमागील ‘अदृश्य’ राजकीय समीकरणे काय असू शकतात? दोन्ही नेते सध्या परस्परविरोधी पक्षात, एक महाविकास आघाडीत तर दुसरे महायुतीत असताना झालेल्या या भेटीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

    विवेक कोल्हे हे नुकतेच भाजपमधून विधान परिषदेवर निवडून आले आहेत, तर निलेश लंके यांनी दीड वर्षांपूर्वी लोकसभा जिंकली आहे. दोन तरुण नेत्यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन स्वतःचे राजकीय वजन वाढवण्यासाठी एकत्र येण्याचा हा प्रयत्न केला आहे का? भविष्यात राजकीय परिस्थिती बदलल्यास लंकेंनी’प्लॅन बी’ तयार ठेवण्यासाठी ही चाचपणी केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    राजकीय वर्तुळात या भेटीमुळे वादळ निर्माण झाले असले, तरी दोन्ही बाजूंकडून या भेटीला ‘केवळ एक सदिच्छा भेट’ असल्याचे सांगण्यात येत आहे. विवेक कोल्हे हे आमदार झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी भेट झाल्याचा दावा दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. राजकारणात “रात्रीस खेळ चाले” या उक्तीचा प्रत्यय या भेटीने पुन्हा एकदा आणून दिला आहे. दिवसा एकमेकांवर टीका करणारे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेते रात्रीच्या अंधारात एकत्र येतात, तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण निर्माण होते.

    एक भाजप पक्षातील तर दुसरा पक्षाबाहेरील विखे विरोधक

    मागील लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नगर दक्षिणमधील निवडणूक लढवत भाजपचे सुजय विखे यांचा पराभव केला होता. तसेच गणेश नगर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवेळी विवेक कोल्हे आणि थोरात गटाला लंके यांनी समर्थन दिले होते. तसेच विवेक कोल्हे हे भाजपमधील विखे विरोधक म्हणून चर्चेत आले होते. त्यामुळे लंके-कोल्हे ही मैत्री जुनी जरी असली तरी मात्र पुन्हा एकदा मध्यरात्री भेट झाल्याने जिल्ह्यातील पुढील राजकीय समीकरणे कशी असतील? याबाबतची चर्चा जिल्हाभर रंगत आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा