• Sat. Jun 6th, 2026

    केरळमध्ये मान्सूनआगमन पाच दिवस आधीच! महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही पावसाळी वातावरण; हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज

    केरळमध्ये मान्सूनआगमन पाच दिवस आधीच! महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही पावसाळी वातावरण; हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज

    Weather Update: भारतीय हवामान खात्याने पावसाळा लवकर सुरू होईल असा अंदाज वर्तविला असून नैऋत्य मोसमी पाऊस 26 मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा प्रतिनिधी, मुंबई: उष्णतेने कहर केला असताना, पावसाचे लवकर आगमन होण्याची आनंदवार्ता हवामान विभागाने शुक्रवारी दिली. सरासरी तारखेपेक्षा पाच दिवस आधीच म्हणजे २६ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. येत्या २४ तासांमध्ये नैर्ऋत्य मौसमी वारे बंगालच्या उपसागरात दक्षिणेला, अंदमानच्या समुद्रात, तसेच अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचू शकतात.

    महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मान्सूनपूर्व वातावरण

    केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख एक जून मानली जाते. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे तीव्र क्षेत्र सक्रिय झाले आहे. या प्रणालीमुळे मान्सूनला चालना मिळाली असून अंदमान-निकोबार बेटांवरही मान्सून सहा दिवस आधीच दाखल होण्याची चिन्हे आहेत. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची अंदाजे तारीख २६ मे असून यामध्ये अधिक-उणे चार दिवसांचा फरक पडू शकतो. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर समुद्रावरून या वाऱ्यांना होणाऱ्या आर्द्रतेच्या पुरवठ्यावर मान्सूनचा पुढील प्रवास अवलंबून असतो. त्यामुळे केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राबद्दलचा अंदाज वर्तवण्यात येईल. मात्र केरळमध्ये मान्सून दाखल होताना महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मान्सूनपूर्व वातावरणनिर्मितीला सुरुवात होईल, अशी माहिती ‘स्कायमेट वेदर’चे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी दिली. एल निनोचा परिणाम यंदा जुलैपासून दिसण्याची सुरुवात आहे. त्यामुळे पर्जन्य जलसंचयन महत्त्वाचे आहे, याकडे हवामान अभ्यासक लक्ष वेधत आहेत.Maharashtra TimesWeather Forecast: महाराष्ट्राच्या हवामानात मोठे उलटफेर, उन्हाचा तडाखा, अवकाळी अन् आता मान्सूनचीही मोठी अपडेट

    मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवताना वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्विपकल्पातील मान्सूनपूर्वसरी, चीनच्या समुद्रावरील विकीरण, आग्नेय हिंदी महासागरातील वारे, नैर्ऋत्य प्रशांत महासागरातील विकिरण, ईशान्य हिंदी महासागरातील वारे या घटकांचा विचार केला जातो. भारतीय हवामान विभागाने गेल्या २१ वर्षांमध्ये म्हणजे २००५ ते २०२५ या कालावधीसाठी वर्तवलेल्या केरळमधील मान्सून आगमनाचा अंदाज सन २०१५ वगळता अचूक ठरला आहे. गेल्या वर्षीही केरळमध्ये मान्सून आगमन अपेक्षेपेक्षा लवकर झाले होते.

    Maharashtra Timesवादळी पावसामुळे उत्तर प्रदेशात 111 ठार; 72 जखमी, अनेक जिल्ह्यांत झाडे उन्मळून पडली, घरांचे नुकसान

    मे महिनाअखेरीस राज्यात मान्सूनपूर्व सरी

    ‘मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह कोकणामुध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होऊ शकते. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय व्हायला काही काळ लागू शकतो’, असे ‘स्कायमेट वेदर]चे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा