• Fri. Jul 3rd, 2026

    महसूल विभागांतर्गत आता केवळ संख्यात्मक नव्हे तर दर्जात्मक सेवांवर भर – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 14, 2026
    महसूल विभागांतर्गत आता केवळ संख्यात्मक नव्हे तर दर्जात्मक सेवांवर भर – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    मुंबई, दि. १४ : महसूल विभाग सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत सेवा देणारा विभाग असून अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तांची समिती नेमण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक महिन्यात एक अभियान राबविण्याचे फ्रेमवर्क तयार करण्यात येईल आणि केवळ संख्यात्मक नव्हे तर दर्जात्मक सेवांवर भर देण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

    ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाबाबत राज्यस्तरीय समितीची बैठक महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. सदस्य आमदार प्रसाद लाड, विक्रांत पाटील, योगेश टिळेकर, अपर मुख्य सचिव विकास खारगे आदी यावेळी उपस्थित होते. समितीचे अन्य सदस्य आमदार ऑनलाईन सहभागी झाले.

    महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यातील सामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना महसूल विभागाच्या सेवा गतीने मिळाव्यात यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना’च्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. या अभियानामुळे महसूल विभागाबद्दल जनतेत विश्वासार्हता निर्माण झाली आहे. आगामी काळात विधान परिषद सदस्यांच्या समन्वयाने हे अभियान अधिक व्यापक केले जाईल. आमदार विक्रांत पाटील यांची ‘राज्यस्तरीय समन्वयक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते लोकसहभाग वाढवण्यासाठी ते काम पाहतील. प्रत्येक जिल्ह्यासाठी विधान परिषद सदस्यांना जबाबदारी देऊन कामावर लक्ष ठेवले जाईल.

    नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाचे बळकटीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात येत असून जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे सुद्धा बळकटीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात येईल. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश महसूलमंत्र्यांनी दिले. 300 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आणि रस्त्यांच्या प्रलंबित केसेस निकाली काढण्यासाठी विशेष अभियान राबवावे असे निर्देशही महसूलमंत्र्यांनी दिले.

    अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी तीन महिन्यात सहा विभागांमध्ये राबविले जात असलेले हे अभियान महसूल विभागाच्या इतिहासातील वैशिष्ट्यपूर्ण अभियान असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागातून विभागाच्या विविध योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. दुहेरी संवादामुळे तसेच महसूल विभागासह इतर विभागांच्या सहभागामुळे नागरिकांमध्ये विश्वासार्हता निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

    सोलापूर जिल्ह्यामार्फत ‘सुराज्य ग्राम मुक्काम’ मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत तालुक्याचे अधिकारी आठवड्यातून एक दिवस गावात मुक्काम करतील. दिवसभरात तीन गावांना भेटी देऊन नागरिकांशी थेट संवाद साधला जाईल. गावकऱ्यांच्या तक्रारींचे ‘डिजिटल ट्रॅकिंग’ पद्धतीने निवारण करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या अभियानाचा अभ्यास करुन ते राज्यभर लागू करता येईल का याबाबत अभ्यास करण्याची सूचनाही महसूलमंत्र्यांनी यावेळी केली.

    ०००००

    बी.सी.झंवर/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed