• Sat. Sep 12th, 2026

महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त  राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येणार – मंत्री अतुल सावे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 6, 2026
महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त  राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येणार – मंत्री अतुल सावे – महासंवाद

मुंबई, दि. ६ : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यासाठी व्यापक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२७ या कालावधीत करण्यात येणार आहे. या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले. ते म्हणाले, द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व कौशल्यविकासाशी निगडित उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहेत.

मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्या संदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या संचालक सोनाली मुळे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री अतुल सावे म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महात्मा फुले यांच्या जीवन व कार्यावर आधारित चित्ररथ सादर करण्याचे नियोजन आहे. तसेच, ओबीसी विभागांतर्गत १०० आश्रमशाळांमधील नववी ते बारावीच्या सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांना इन-हाऊस कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये टूलकिटसह आश्वासित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेले मूळ ग्रंथ तसेच त्यांच्या जीवनकार्यावरील साहित्य विद्यार्थ्यांना व नागरिकांना विनामूल्य वितरित करण्याचाही आराखडा तयार करण्यात आला आहे. जयंती वर्षानिमित्त विविध उपक्रमांद्वारे महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करून सामाजिक जागरूकता वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री सावे यांनी यावेळी सांगितले.

जयंती वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

0000

शैलजा पाटील/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed