• Tue. Jun 16th, 2026

    Vande Bharat Mumbai: मुंबईला येताना खाऊ घेण्यासाठी वडील वंदे भारतमधून उतरले, चिमुकली आतच अन् तेवढ्यात ट्रेन सुटली; नंतर काय घडलं?

    Vande Bharat Mumbai: मुंबईला येताना खाऊ घेण्यासाठी वडील वंदे भारतमधून उतरले, चिमुकली आतच अन् तेवढ्यात ट्रेन सुटली; नंतर काय घडलं?

    Vande Bharat Train News: रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) जवान विनय प्रकाश आणि एएसआय एन. एन. नलावडे यांनी पुढाकार घेऊन मुलीची जबाबदारी स्वीकारली.

    Vande Bharat Train(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी – मुलीला भूक लागल्यामुळे एक पालक बिस्किटे घेण्यासाठी रेल्वेतून खाली उतरले; पण काही वेळातच रेल्वे सुटली आणि त्यांच्यासोबत प्रवास करणारी तीन वर्षांची मुलगी धावत्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये एकटीच राहिली. प्रवासात रेल्वे अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ तत्परतेने राबवून काही तासांतच त्या चिमुकलीची आई-वडिलांशी सुरक्षित भेट घडली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

    ‘सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’मधून दोन मे रोजी राहुल खुरमुटे हे तीन वर्षांच्या मुलीसह प्रवास करीत होते. ‘वंदे भारत’ कुर्डुवाडी स्थानकात आल्यानंतर मुलीला भूक लागल्यामुळे ते बिस्किटे आणण्यासाठी खाली उतरले. त्या वेळी काही वेळात ‘वंदे भारत’ मुंबईकडे सुटली आणि त्यांना चढता आले नाही. डब्यात मात्र त्यांची तीन वर्षांची मुलगी एकटीच राहिली. गाडीने वेग पकडताच चिमुरडी घाबरून रडू लागली. सी-५ कोचमधील सीट क्रमांक ३० वर एकटी रडणारी मुलगी पाहून प्रवाशांचे लक्ष गेले. त्यांनी त्याची माहिती तत्काळ टीटीई एच. एल. मीना यांना दिली.

    मीना यांनी चौकशी केल्यानंतर मुलीचे वडील खाली राहिल्याचे समजले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नियंत्रण कक्षाला माहिती दिली. काही क्षणांतच ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ सक्रिय झाले. एका महिला प्रवाशाच्या मदतीने संपूर्ण प्रवासात तिची काळजी घेण्यात आली आणि तिला शांत केले.

    लहान मुलीला नीट माहिती देता येत नव्हती. त्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आरक्षणाच्या तपशीलावरून मुलीच्या वडिलांची माहिती काढली. त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना धीर देऊन मुलगी सुरक्षित असल्याचे सांगून पुढील गाडीने पुण्याला येण्यास सांगितले. त्या वेळी कुर्डूवाडी रेल्वे स्थानकातील रेल्वेचे अधिकारी मदतीला आले. नियोजनबद्ध समन्वयानंतर मुलीला पुणे स्थानकावर उतरवले. तिचे पालक दुसऱ्या रेल्वेने पुण्यात आल्यावर मुलीला त्यांच्या स्वाधीन केले. क्षणभराच्या दुर्लक्षामुळे घडलेली ही घटना असली, तरी आरपीएफ आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे एका कुटुंबावर ओढवू शकणारा मोठा प्रसंग टळला.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा