• Sat. Jun 6th, 2026

    Rahuri Bypoll Result: राहुरीत पवारांच्या राष्ट्रवादीवर मोठी नामुष्की; उमेदवाराचं डिपॉझिट जप्त, अक्षय कर्डिलेंचा विक्रमी मताधिक्याने विजय

    Rahuri Bypoll Result: राहुरीत पवारांच्या राष्ट्रवादीवर मोठी नामुष्की; उमेदवाराचं डिपॉझिट जप्त, अक्षय कर्डिलेंचा विक्रमी मताधिक्याने विजय

    Rahuri By Election Result News: प्राजक्त तनपुरे यांच्या माघारीमुळे महाविकास आघाडीची ताकद कमी झाली आणि निवडणुकीचा कल मोठ्या प्रमाणात भाजपकडे झुकला.

    राहुरीत पवारांच्या राष्ट्रवादीवर मोठी नामुष्की; उमेदवाराचं डिपॉझिट जप्त, अक्षय कर्डिलेंच्या विक्रमी मताधिक्याने विजय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अहिल्यानगर: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी १ लाख, १२ हजार ५८७ मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधनानंतर ही पोट निवडणूक लागली होती. या निवडणुकीत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना १ लाख ४० हजार ९३ मते तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना २७ हजार ५०६ मते मिळाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच अक्षय कर्डिले यांनी एकतर्फी आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीत वाढत गेलेली आघाडी पाहता निकालाची औपचारिक घोषणा होण्यापूर्वीच त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. अखेरीस मोठ्या फरकाने त्यांनी पोटनिवडणुकीत बाजी मारत राहुरीतील राजकारणात भाजपचा झेंडा पुन्हा फडकवला आहे.

    तनपुरेंची माघार ठरला टर्निंग पॉइंट

    राहुरी पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेला माघारीचा निर्णय टर्निंग पॉइंट ठरला. सुरुवातीला तनपुरे निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र अचानक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट तनपुरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी निवडणूक न लढवायचा निर्णय घेतला आणि राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. या चर्चेनंतर तनपुरे यांनी राहुरीच्या विकासासाठी एक पाऊल मागे घेत आहे असे सांगत निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला.

    पवारांच्या राष्ट्रवादीकडून शेवटच्या क्षणी मोकाटेंना उमेदवारी

    तनपुरे यांच्या माघारीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर उमेदवाराचा प्रश्न निर्माण झाला. शेवटच्या क्षणी पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र अचानक मिळालेल्या संधीमुळे त्यांना प्रभावी प्रचार यंत्रणा उभारता आला नाही आणि त्याचा परिणाम थेट निकालावर दिसून आला. त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला.

    दरम्यान, शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चांना सुरुवातीला जोर होता. मात्र प्राजक्त तनपुरेंच्या माघारीनंतरही निवडणूक झाली आणि अखेर थेट लढतीत भाजपने बाजी मारली. या निकालामुळे राहुरीतील राजकीय समीकरणे बदलली असून भाजपने आपली ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. एकंदरीत, तनपुरे यांच्या माघारीपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत घडलेल्या राजकीय घडामोडींनी राहुरी पोटनिवडणूक अत्यंत नाट्यमय बनवली. मात्र शेवटी संघटनशक्ती, रणनीती आणि नेतृत्वाच्या जोरावर अक्षय कर्डिले यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपचा झेंडा उंचावला. अक्षय कर्डिले यांनी आपले वडील दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्यापेक्षाही जास्त मतांनी विजय मिळवला असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा