• Sat. Jun 6th, 2026

    Mumbai-Mandwa Ro-Ro Ferry: प्रवासी जहाजात असतानाच तांत्रिक बिघाड, मुंबई-मांडवा रो-रो फेरी ऐनवेळी रद्द; सुट्ट्यांमध्ये प्रवाशांचा खोळंबा

    Mumbai-Mandwa Ro-Ro Ferry: प्रवासी जहाजात असतानाच तांत्रिक बिघाड, मुंबई-मांडवा रो-रो फेरी ऐनवेळी रद्द; सुट्ट्यांमध्ये प्रवाशांचा खोळंबा

    Mumbai News: मंगळवारी मुंबई ते मांडवा फेरीच्या रॅम्पमध्ये बिघाड झाल्यामुळे दिवसभर सेवा रद्द करण्यात आली. मांडवा ते भाऊचा धक्कादरम्यान ही सेवा असते.

    अमुलकुमार जैन, रायगड: मुंबई ते मांडवा दरम्यान धावणारी सकाळी 8 वाजताची रो-रो फेरी आज ऐनवेळी तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. विशेष म्हणजे अनेक प्रवासी आपल्या वाहनांसह आधीच जहाजावर चढलेले असतानाच ही अडचण निर्माण झाल्याने बंदर परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

    मिळालेल्या माहितीनुसार, फेरी सुटण्यापूर्वी जहाजाचा रॅम्प बंद होत नसल्याची समस्या अचानक समोर आली. सुरुवातीला नेमकी अडचण काय आहे, याची माहिती प्रवाशांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे सुमारे २० मिनिटे प्रवासी संभ्रमावस्थेतच जहाजावर थांबून राहिले. काही प्रवाशांनी कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता स्पष्ट उत्तर न मिळाल्याने नाराजीही व्यक्त केली जात होती.

    अर्धा तास वाट बघूनही अपयश

    दरम्यान, जहाजावरील अभियंते तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रॅम्प प्रणालीत तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याने जहाज सुरक्षितपणे सुटणे शक्य नव्हते. अभियंत्यांनी जवळपास अर्धा तास विविध उपाय करूनही बिघाड दूर करण्यात अपयश आले.

    अखेर सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास अधिकृत घोषणा करून मंगळवारची फेरी रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. या घोषणेनंतर प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांचे नियोजन विस्कळीत झाले असून काही प्रवाशांना महत्त्वाच्या कामांसाठी उशीर झाला. प्रशासनाकडून सर्व प्रवाशांना शांततेने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, जहाजावरील सर्व वाहनधारकांना आपल्या गाड्या खाली उतरवून पर्यायी मार्गाने प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र अचानक फेरी रद्द झाल्याने पर्यायी व्यवस्था अपुरी पडत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.

    या घटनेमुळे रो-रो फेरी सेवेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार पुढे येत आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सेवा पुरवणाऱ्या यंत्रणांनी अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

    मुंबई-मांडवा रो-रो सेवेचा मार्ग

    मुंबई-मांडवा रो रो फेरीही राज्यातील वर्षभर चालणारी पहिलीच रो-रो सेवा आहे. या सेवेमुळे प्रवासी आणि वाहनांना केवळ 1 तासांत मुंबईहून मांडव्यापर्यंत पोहोचवते. रस्त्याने या प्रवासासाठी 5 तास लागतात. ही फेरी मुंबईहून भाऊचा धक्का, माझगाव, मांडवा जेटी (अलिबाग) असा या फेरीचा मार्ग आहे. एकावेळी या फेरीमध्ये 120हून अधिक वाहनं आणि 600हून अधिक प्रवासी प्रवास करू शकतात.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा