काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडिओने रिक्षा प्रवासाचा गंभीर प्रश्न चव्हाट्यावर आणला आहे. लग्नसराई आणि सुट्ट्यांमुळे रिक्षा मिळेनाशी झाली असून, मनमानी भाडे आकारणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
रिक्षांचा तुटवडा, प्रवाशांचे हाल
मुळात कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा स्थानकांवर संध्याकाळच्या वेळेत तुटपुंज्या रिक्षा प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध असतात. रिक्षांची संख्या आणि प्रवाशांची गर्दी यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे अनेकांना कामावरून परतताना घरी जाण्यासाठी रिक्षा मिळत नाहीत. एकीकडे रिक्षांची मोठी मागणी असते, तर दुसरीकडे रिक्षा स्थानके मात्र रिकामी दिसू लागतात. त्यामुळे रिक्षांच्या प्रतीक्षेत अनेक प्रवासी तासन्तास अडकून पडलेले पाहायला मिळतात.
प्रवाशांची आर्थिक लूट सुरू
या समस्येची दुसरी बाजूही तितकीच गंभीर आहे. वरील सर्व प्रकार लक्षात घेता, एखादी रिक्षा अशावेळी रिकामी असेल तर चालकांना मनमानी करण्यास मोठा वाव मिळतो. अशातूनच प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
Rohit Pawar : काळी जादू, बोकड बळी, तीन दिवसांची पूजा ते भोंदूबाबा खरातचं कनेक्शन; अजित पवार प्रकरणात रोहित पवारांचे स्फोटक दावे
रिक्षा संघटनांची नाराजी
या सर्व प्रकारानंतर रिक्षा चालक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांना लूटणारे रिक्षाचालक हे आमच्या संघटनेचे सदस्य नाहीत. तसेच प्रवासी वाहतुकीसाठी बाद ठरवण्यात आलेल्या, परवाना नसलेल्या आणि बॅज नसलेल्या रिक्षाही येथे सर्रासपणे वापरल्या जातात. अशा चालकांचा आमच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
लग्नसराई आणि सुट्टीच्या हंगामाचा परिणाम
सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला, जेव्हा नोकरदार प्रवासी कामावरून परतत असतात, अशावेळी हा प्रकार सर्वाधिक घडतो. वाहनांचा तुटवडा आणि प्रवाशांची गर्दी याचाच फायदा घेत काही रिक्षाचालक जास्तीचे भाडे आकारून प्रवाशांची लूट करत आहेत. सध्या लग्नसराई आणि सुट्टीचा हंगाम असल्याने अनेक रिक्षाचालक गावी किंवा त्यांच्या मूळ प्रांतात गेले आहेत. त्यामुळे रिक्षांचा तुटवडा जाणवत आहे. त्याचाच फायदा काही जण घेत असल्याचा तक्रारीचा सूर रिक्षा संघटनांनी व्यक्त केला आहे. अशा भामट्या चालकांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रवाशांची फसवणूक टाळण्याचे आवाहन
“प्रवासी हाच आमचं सर्वस्व आहे. त्याची अशी फसवणूक आणि पिळवणूक करण्याआधी रिक्षा चालकांनी विचार करावा. वाहतुकीची गैरसोय असताना प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेऊ नये. नेहमीच्या भाड्यातच वाहतूक करावी,” असे आवाहन यावेळी रिक्षा चालक-मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
