• Sat. Jun 6th, 2026
    Marathi Compulsion : ‘शिंदेंना भेटून सांगणार, सरनाईक यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा’, भाजप आमदार नरेंद्र मेहता आक्रमक

    भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर सडकून टीका केली आहे. “प्रताप सरनाईक यांनी मराठी माणूस आणि परप्रांतीयांचा छळ केला. एकनाथ शिंदे यांनी अशा मंत्र्यांना मंत्रिपदावरुन काढलं पाहिजे”, असा घणाघात नरेंद्र मेहता यांनी केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना येत्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून मराठीत संभाषण करणं अनिवार्य असणार आहे. मराठी बोलता येणार नसेल तर अशा रिक्षा चालकांचे थेट परवाने रद्द करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. प्रताप सरनाईक यांच्या या निर्णयाला अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी विरोध केला आहे. त्यांनी सरकारला संपाचा इशारा दिला होता. यानंतर प्रताप सरनाईक यांची आज टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या संघटनेसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रताप सरनाईक यांनी भूमिका मांडली. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकता यावी यासाठी ते मराठीसक्तीचा निर्णय पुढे ढकलणार का? याबाबत पुढच्या दोन दिवसांत स्पष्ट करणार आहेत. पण ते अजूनही मराठी सक्तीच्या निर्णयावर ठाम आहेत. दुसरीकडे प्रताप सरनाईक यांच्यावर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी घणाघात केला आहे.

    नरेंद्र मेहता नेमकं काय म्हणाले?

    “प्रताप सरनाईक ज्यावेळी बोलतात त्याला कुणीही भीक घालत नाही. रिक्षावालेही भीक घालत नाही. कारण ते जे बोलतात ते कधीच होत नाही. त्यांचे अनेक उदाहरणे बघा. ते बोलतात आणि नंतर यूटर्न घेतात. एक नाही, कुठलाही विषय तुम्ही घ्या. सगळ्यांमध्ये ते युटर्न घेतात”, अशी टीका नरेंद्र मेहता यांनी केली. “प्रताप सरनाईक यांनी नेहमी मराठी माणसाचा उपयोग केला आहे. मराठी माणासाच्या नावाचा वापर करुन मतं घेण्याचं काम केलं आहे. परप्रांतीयांसोबतही त्यांनी तशाचप्रकारचे काम केलं आहे. कधी त्यांच्यासोबत तर कधी त्यांच्या विरोधात अशाप्रकारची भूमिका घेतात. त्यांना स्वत:लाच माहिती नाही की त्यांना करायचं काय आहे आणि काय नाही”, अशी खोचक टीका त्यांनी केली.

    “आमच्या पक्षाचा प्रश्न असता तर आम्ही केलंच असतं. शेवटी ते शिवसेनेचे आहेत. पण मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणार की, पक्षाची आब्रू हे मलिन करत आहेत. अशा लोकांना तुम्ही मंत्रिमंडळातून बाहेर काढलं पाहिजे”, असा घणाघात नरेंद्र मेहता यांनी केला.

    “तुम्ही परवापर्यंत परवानगी देत होते. प्रताप सरनाईक स्वत: आरटीओच्या माध्यमातून एका परमीटचे 15 हजार रुपये घ्यायचे. नंतर अंगाशी आलं की, परवानगी बंद. तुम्ही रोहिंग्या, मुस्लीम यांनाही परवानगी दिली. त्यावेळी वाटलं नाही का की मराठी माणसाला न्याय द्यायला पाहिजे. त्यावेळी तुम्ही मराठीला डावललं. रोंहिग्या, मुस्लिमांना परवानगी द्यायला लागले. बोगस कागदांवर दे दना दन परमीट देऊ लागले. जो माणूस मेला त्याच्याही रिक्षा अजून पासिंग होत आहेत. एका व्यक्तीकडे दोन ते तीन परमीट आहेत. प्रताप सरनाईक यांनी नैतिकता स्वीकारुन राजीनामा दिला पाहिजे”, असं नरेंद्र मेहता म्हणाले. टीव्ही 9 ला प्रतिक्रिया देताना त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर खोचक टीका केल आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा